गाय वासरु देण्या-घेण्याच्या वादातून मोठ्या साडभावाने लहान्यास चाकूने भोसकले
भोकर पोलीसात याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील पोमनाळा येथील गोशाळेत खासगी नौकरी करणाऱ्या दोन साडभावांत गाय वासरु देण्या-घेण्याच्या कारणावरुन वाद झाला व यातून मोठ्या साडभावाने लहान्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले असून या प्रकरणी चाकूने वार करणाऱ्या मोठ्या साडभावाविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोमनाळा ता.भोकर येथे उद्योजक देवानंद धुत यांची एक गोशाळा आहे.या गोशाळेत माधव पिराजी निरडवाड (५८) रा.कोळगल्ली भोकर व त्यांचा मोठा साडभाऊ दसरथ गंगाराम रामनबोईनवाड(६०) हे दोघे याच गोशाळेवर खासगी नौकरी करतात.दि.१ मे २०२४ रोजी माधव पिराजी निरडवाड हे घरी जेवन करुन ते आराम करत असतांना रात्री १०:०० वाजताच्या दरम्यान त्यांचा मोठा साडभाऊ दसरथ गंगाराम रामनबोईनवाड घरी आला व माधव निरडवाड यास म्हणाला की,मी गेल्या दीड वर्षापासून या गोशाळेवर काम करत आहे,मीच तुला गेल्या ९ महिन्यांपूर्वी या गोशाळेवर नौकरी लावलो.परंतू गोशाळेचे मालक देवानंद धुत यांनी मला गाय वासरू दिले नाही.तुलाच कसे काय दिले ? त्याचा हक्कदार मी आहे.त्यामुळे ती गाय व वासरु मला दे म्हणून वाद घातला आणि शिविगाळ केली.हा वाद वाढत गेला.यामुळे राग अनावर झालेल्या दसरथ रामनबोईनवाड त्यांनी जवळील चाकू काढला व लहान साडभाऊ माधव निरडवाड यांच्या पोटात उजव्या बाजुस बरगडीवर त्या चाकुने मारुन दुखापत केली आणि त्यांनतर दुसरा वार डाव्या बाजुच्या कमरेजवळ केला.यात माधव निरडवाड यांना गंभीर दुखापत झाली.यावेळी घरी जेवण करत असलेली माधव निरडवाड यांची पत्नी सौ.कौशल्याबाई माधव निरडवाड (५५) व मुलीने आरडाओरड केली.यामुळे शेजारचे काही जण मदतीसाठी धाऊन आले व त्या सर्वांच्या मदतीने जखमी माधव निरडवाड यांना प्रथम भोकर पोलीस ठाण्यात नेले.यावेळी जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले.शासकीय ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केला आणि गंभीर दुखापत झाली असल्याने अधिक उपचारासाठी त्यांची रवानगी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात केली.सौ. कौशल्याबाई माधव निरडवाड यांनी उपरोक्त आशयाचा जबाब दिल्यावरुन दशरथ गंगाराम रामनबोईनवाड यांच्या विरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.जखमी माधव निरडवाड यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून दशरथ रामनबोईनवाड यांना अटक करण्यात आली आहे.तर पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे हे करत आहेत.