‘स्व.चव्हाणांचे’ आशिर्वाद वसंत चव्हाणांच्या पाठीशी ?
भाजपाचे स्टार प्रचारक खा.अशोक चव्हाण यांच्या ‘होम पिचवर’ स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे फोटो काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रसिद्धी फलकांवर…
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : काँग्रेस पक्षाचा व भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा त्याग करुन कमळ हाती धरुन राज्यसभेचे खासदार झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना होत असलेल्या १८ व्या लोकसभा निवडणूक प्रक्रिये दरम्यान भाजपाने महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून घोषित केले आहे. परंतू त्यांच्या ‘होम पिचवर’ १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे तथा महाविकास घाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ व सभास्थानी वापरल्या जाणाऱ्या प्रसिद्धी फलकांवर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांचे वडील स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे फोटो लाऊन प्रचार व प्रसिद्धी केल्या जात आहे. यातून खा.अशोक चव्हाण हे भाजपात गेले असले तरी त्यांच्या वडिलांचे आशिर्वाद मात्र उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी आहेत,असे दर्शविल्या जात असल्याची चर्चा अनेकांतून होत आहे.
होऊ घातलेल्या १८- व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भाजपाने महाराष्ट्रातील महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून ४० जणांची यादी घोषित केली आहे.त्यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचे नाव आहे. स्टार प्रचारक म्हणून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली असल्याने त्यांना अनेक मतदार संघात जावे लागणार आहे.परंतू दरम्यानच्या काळात १६- नांदेड लोकसभा मतदारसंघात अर्थातच ‘होम पिचवर’ मात्र महाविकास आघाडीचे विरोधी उमेदवार माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या प्रचार व प्रसिद्धी फलकांवर विकास पुरुष माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा फोटो वापरला जात आहे.असे करुन खा.अशोक चव्हाण यांच्यापुढे ‘अडचण’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून ‘स्व.चव्हाणांचा’ आशिर्वाद उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी आहे ? असे अनेकांतून बोलल्या जात आहे.हे निदर्शनास येत असतांना खा.अशोक चव्हाण यांना माझ्या वडिलांचा फोटो वापरु नये,असे म्हणता ही येत नाही व महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार व प्रसिद्धी फलकांवर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा फोटो टाका असे ही म्हणता येत नाही,अशी अलिखित अडचण त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटास खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मान्यता व पक्ष चिन्ह ही वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.परंतू माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचा फोटो वापरण्यास मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधित केले आहे.त्यामुळे त्यांना शरदचंद्र पवार यांचा फोटो वापरता येत नाही.तर शिवसेनेच्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेस पक्ष चिन्ह व खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आहे.परंतू शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो वापरता येत नाही.नव्हे तर माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व खा.संजय राऊत यांनी शिंदे शिवसेनेने आमचा ‘बाप’ चोरला आहे,असा आरोप अनेकवेळा केला आहे.त्यामुळे त्यांना ही तो फोटो वाफरता येत नाही.असा आरोप खा.अशोक चव्हाण यांना मात्र करता येणार नाही व माझ्या वडिलांचा फोटो महाविकास आघाडीच्या उमेदवाराने वापरु नये असे ही म्हणता येत नाही.कारण खा.अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केले आहे,त्यांचे वडील स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेले नाही.ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते होते आणि त्यांनी हयात याच पक्षात घातली आहे.त्यामुळे काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना त्याचे वडील माजी आमदार स्व.बळवंतराव चव्हाण यांच्या फोटो सोबत पितृतुल्य स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यास प्रतिबंधित करता येणार नाही ? तर भाजपा-महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार व प्रसिद्धी फलकांवर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा फोटो वापरा असे ही म्हणता येत नाही.कारण स्व.डॉ. शंकरराव चव्हाण हे भाजपाचे नेते नव्हे तर साधे पक्ष सदस्य ही नव्हते.एकूणच महाविकास आघाडीने स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या फोटोचा वापर करून स्टार प्रचारक खा.अशोक चव्हाण यांना ‘होम पिचवर’ खिंडीत पकडले आहे.पक्षांतर करण्यापुर्वी पर्यंत खा.अशोक चव्हाण यांचे अमुल्य सहकार्य माजी आमदार वसंत चव्हाण यांना लाभले आहे व स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे आशिर्वाद ही मिळाले आहे.नव्हे तर ‘स्व.चव्हाणांचे’ आशिर्वाद वसंत चव्हाण यांच्या पाठीशी आजही आहेत,असे दर्शविल्या जात आहे.यामुळे सामान्य मतदारांत ‘संभ्रमावस्था’ निर्माण होत आहे.याचा कितपत फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत चव्हाण यांना होईल ? हे ४ जून २०२४ रोजी पहावयास मिळणारच आहे.तो पर्यंत स्टार प्रचारक खा.अशोक चव्हाण याविषयी त्यांची भूमिका काय आहे ? हे स्पष्ट करतीलच …तर मग त्या क्षणाची ही वाट पाहूयात…!