Sun. Dec 22nd, 2024
Spread the love

हा सण बंजारा समाजाच्या परंपरागत एकात्मतेचे प्रतिक असल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेवरुन पदाधिकारी भोकर तालुक्यातील ५९ तांड्यांवर होणार आहेत यात सहभागी…

उत्तम बाबळे,संपादक
संपादकीय…

भारतीय जनता पार्टी तर्फे वंचितांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी गेल्यावर्षी ‘पालावरची दिवाळी’ साजरी करण्यात आली.तर होळी हा सण बंजारा समाजाच्या परंपरागत एकात्मतेचे प्रतिक असल्याने यावर्षी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेवरुन लोकसंस्कृती जपत तांड्यावरील बंजारा समाजाच्या आनंदोत्सवी सणात सहभागी होऊन ‘होळी’ सण साजरा केला जाणार आहे.याबाबदची पुर्वतयारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली असून याच अनुषंगाने आज दि.२४ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदार संघातील ‘जांभळी’ या तांड्यावर (गावी) बंजारा समाजासोबत ‘होळी’ सण साजरा करणार आहेत.तसेच तालुक्यातील ५९ तांड्यावर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून ‘होळी’ च्या आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत. भटक्या विमुक्तांच्या कुटूंबांसोबत ‘पालावरची दिवाळी’ साजरी करतांना भाजपाचा जो शुद्ध हेतू होता तो कौतुकास्पद आहे,परंतू होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कार्यकाळात भाजपा जर तांड्यावर जाऊन बंजारा समाजासोबत ‘होळी’ साजरी करत असेल तर यामागे बहुसंख्येने असलेल्या मतांच्या बेरजेचे राजकारण तर नाही ना ? असा प्रश्न ही अनेकांतून उपस्थित केला जात आहे.

बंजारा समाजाची तांड्यावर अशा प्रकारे साजरी होते परंपरागत होळी…
होळीचा सण हा संपूर्ण भारतात सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्रातील बंजारा समाजही आपल्या पंरपरागत पद्धतीने हा सण साजरा करतो.प्राचीन काळापासून ‘होळी’ च्या उत्सवात बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी,विविध परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडते.होळी व रंगपंचमी हा सण बंजारा समाज सामुहिकपणे साजरा करतो. यातून बंजारा समाजाच्या एकात्मतेचे दर्शन घडते.बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा सण उत्सव,समाज जीवनाचा अविभाज्य अंग ठरला आहे.परंपरेने चालत आलेली मौखिक गाणी,डफावर,डफडीवर चाललेला लोकसमूहाचा नृत्यमय आविष्कार,पारंपरिक वेशभूषा,केशभूषा बंजारा समाजातील आगळेवेगळे आकर्षण ठरते.बंजारा समाजातील लोकसंस्कृतीच्या प्रवाहांतर्गतचे रितीरिवाज,सण,उत्सव,व्रत, खेळ आणि मनोरंजनाचा यात समावेष असतो.बंजारा समाजाची लोकगीते,जन्म,विवाह आणि मृत्यू या संबंधी असतात.व्रत व उत्सवातील लोकगीते हे तीज उत्सव, जन्माष्टमी,होळी,क्रिया गीत,कृषिसंबधी गीते,घटीर गीते,लोरी गीते,पारिवारीक संबंधातील देवर-भाभी,सास-बहु,उपदेष गीते आणि मुलींची खेळ गीते यांसह आदी प्रकारच्या गितांचा यात समावेश असतो. लडी नृत्य,उपरेरो नृत्य,डोडो नगारा नृत्य,पीर नृत्य,राधा नृत्य,लंगडी पाय नृत्य,कुमारी कन्या नृत्य,दांडा जोडी नृत्य,टिपरी नृत्य,तीज नृत्य इत्यादी नृत्यप्रकार बंजारा समाज सादर करतो.बंजारा समाजाच्या लोककथा व अध्यात्मिक कथांमध्ये सतीसावित्री,नीती,धर्मेरोफल,गुरूरी आज्ञारा फल, चतुरकुकडो,चतुरसाकिया,अवतारी बलष अशा आदी बाबी असतात.समाजाच्या अध्यात्मिक कथेअंतर्गत संत सेवालाल महाराज यांचा जन्म,मृत्यू व त्यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा ही त्यात समावेष असतो.
होळी सण हा सर्व हिंदू समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केला जातो.परंतू बंजारा समाजात हा सण कुठे तीन दिवस, पाच दिवस,आठ दिवस,महिनाभर,तर कुठे दांडी पौर्णिमेपासून गुढीपाडव्या पर्यंत साजरा केला जातो.लोकगीते हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहे.खरं तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते.यावेळी गायले जाणाऱ्या गीतांना ‘लेंगीगीत’ असेही म्हटले जाते.बंजारा समाजाच्या होळीत ‘पाल’,’गेर’, ‘फगवा’,’धुंड’ अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. बंजारा समाजाचा संघर्ष,शिक्षणाचे महत्त्व,व्यसनमुक्ती किंवा वात्रटीका अशा स्वरुपात ही गाणी असतात. तांड्यावरील सर्व समाज या उत्सवात सामील होतो. होळीमध्ये लेंगी गीत गायल्या जाते. लेगी गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असते.या लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नाचत असतात.लेंगी गीतांच्या ठेक्यावर आबालवृद्ध अक्षरश: स्वत:चं वय विसरुन बेभानपणे नाचतात.तीन दिवस हा उत्सव काही तांडयावर साजरा होतो. तर प्रत्येक तांडयावर होळीचे रंग उधळले जातात.इतर समाजामध्ये होळी ही धुलीवंदनाच्या (रंगपंचमी) आधल्या दिवषी सायंकाळी पेटते,परंतू बंजारा समाजामध्ये दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणजे धुलीवदनाच्या दिवशी ही पेटवली जाते. यावेळी ज्यांचे लग्न या वर्षात करायचे असते असे उपवर मुले होळीसाठी लाकडे जमा करतात.या उपवर मुलांना ‘गेरीया’ असे म्हटले जाते.होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी अख्ख्या तांड्यावरील बंजारा समाज आनंदात हरवून गेलेला असतो.समाजातील महिला यादिवशी बंजारा लोकगीतं गात ‘फाग’ किंवा ‘फगवा’ मागतात.‘फगवा’ किंवा ‘फाग’ म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने पैसे घेणे होय.याच बरोबर परंपरागत अनेक कार्यक्रम ही घेतले जातात.तांड्यावरील संपुर्ण समाज एकत्र येऊन होळी हा सण साजरा करतो, हे एकात्मतेचे प्रतिक आहे.राग,द्वेष,मत्सर,वैर,आळस,नैराश्य आदी अवगुण ‘होळीच्या’ अग्नीत जाळली जातात व पुरणपोळीचा गोडवा शुद्ध अंतःकरणात प्रेमभावे साठवून सुख,समाधान व आनंदाचे,सुआरोग्याचे विविध रंग उधळत सर्वजण त्यात रंगुण जातात.ही एक सामाजिक परंपरागत आनंदोत्सवी पर्वणीच आहे.यामुळे यात आपण ही सहभागी व्हावे व या आनंद रंगोत्सवात न्हाऊन घ्यावे असे बंजारा समाजासह इतरांनाही वाटते.

आज खा.अशोक चव्हाण जांभळी तांड्यावर करणार आहेत ‘होळी’ साजरी…
मराठवाडा,विदर्भ व एकूणच महाराष्ट्रातील बंजारा समाजाची लोकसंख्या पाहिली तर राजकीय दृष्ट्या नक्कीच ती दखलपात्र आहे.उदा.नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर तालुक्यात ६८ ग्रामपंचायती आहेत आणि यात बंजारा समाज वास्तव्याचे ५९ तांडे आहेत.अशा प्रकारची विशेष बाब लक्षात घेऊनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘पालावरच्या दिवाळी’ पेक्षा अधिक महत्व तांड्यावरच्या ‘होळीस’ देऊन एकाच दिवशी आनंदोत्सवी सण साजरा करण्याच्या निमित्ताने भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तांड्यावर उपस्थित राहून बंधारा समाजास ‘आपलसं’ करावं अशा सुचना दिल्या आहेत.

याच सुचनेवरुन भोकर तालुक्यातील ५९ तांड्यावर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून आज बंजारा समाजाच्या ‘होलीकोत्सवात’ सहभागी होणार आहेत.यात तालुकाध्यक्ष गणेश कापसे पाटील(शिवनगर बेंद्री तांडा),सभापती जगदीश पाटील भोसीकर (बेंद्री सोसायटी तांडा),जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर (बेंद्री जगराम तांडा),भगवान दंडवे (बल्लाळ म्हैसूर तांडा),प्र.का.स.संतोष मारकवार(धारजणी गाव तांडा),ओबीसी जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड (नांदा तांडा म्हैस.प.),सरचिटणीस बाळा साकळकर (चिदगीरी फलवाडी जळका तांडा) अशा प्रकारे एकूण ५९ तांड्यावर आदी पदाधिकारी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण हे ‘जांभळी तांड्यावर’ उपस्थित राहून बंजारा समाजाच्या आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत.जांभळी हा तांडा त्यांनी का निवडला ? तर त्याचे उत्तर त्यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार अभिता चव्हाण यांनी विकासासाठी हा तांडा ‘दत्तक’ घेतला होता,असे असू शकते. त्यांनी दत्तक घेऊन या तांड्याचा किती विकास केला ? हा अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे,ही बाब वेगळी.परंतू नांदेड जिल्हा,भोकर विधानसभा मतदार संघातील व विशेषतः भोकर तालुक्यातील बंजारा समाजावर त्यांची मोठी पकड आहे.नांदेड मध्ये हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव चव्हाण, संत सेवालाल महाराज यांचे पुतळे व स्मारकाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे.तर भोकर मध्ये देखील संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकासाठी भव्य जागा व ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.यामुळे बहुसंख्य बंजारा समाज मतदार सद्यस्थितीला तरी त्यांच्या पाठीशी आहे.त्यांची सहानुभूती सदैव आपल्या सोबत रहावी व भाजपाच्या पारड्यात बहुमते पडावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला गेला असावा,असे बोलल्या जात आहे.अशा प्रकारे भाजपाचे प्रमुख पदाधिकारी एकाच दिवशी भाजपाचे पदाधिकारी ‘तांड्यांवर’ उपस्थित राहून ‘होलीकोत्सवात’ सहभागी होण्यामागे नक्कीच ‘मताच्या बेरजेचे’ राजकारण असल्याचा शुद्ध हेतू लपून राहिलेला नाही,असे निदर्शनास येत आहे. बंजारा समाजाच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या होलिकोत्सवात सहभागी होण्याचा भाजपाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल ? हे प्रश्नांकित असले तरी विरोधी पक्षांची निष्क्रीयता मात्र यातून ‘उजागर’ होत आहे.आदर्श आचारसंहितेच्या काळात राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगातून भाजपाने ग्रामीण भागातील प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचा शुभमुहूर्त केला असून यातून नक्कीच मतांच्या बेरजेचे गणित आखले गेले आहे ? ही बाब लक्षणीय आहे.तर मग पाहूयात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यात कितपत यश मिळेल…ते ?(सर्व छायाचित्रे -गुगल संग्रहित सौजन्य)

होळी व धुलीवंदनाच्या सर्वांना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा! – संपादक 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !