श्रीजया चव्हाणांच्या नेतृत्वात संदेशखालीतील महिलांवरील अत्याचाराचा भोकर मध्ये केला निषेध
तहसिलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निवेदन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पश्चिम बंगाल मधील संदेशखालीमध्ये मुले,मुली, महिलांवर अनन्वित अत्याचार,बलात्कार,शारीरिक शोषण,मारहाण व जमिनी बळकावणे यांसह आदी प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळ करण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत.सदरील अमानुष घटनांचा माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांच्या कन्या भाजपाच्या नवनेत्या श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी दि.५ मार्च रोजी भोकर मध्ये जाहीर निषेध व्यक्त केला असून या गंभीर बाबीकडे समाजासह देशाचे महामहिम राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या मार्फत हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल मधील संदेशखली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहाँ शेख याने जबरदस्तीने अनेकांच्या जमिनी बळकावल्या व लहान मुले,मुली,महिलांवर अनन्वित अत्याचार केले आहेत.या आरोपाखाली गेल्या दोन महिन्यांपासून तो फरारी होती.नुकतीच त्यास अटक झाली असली तरी त्याच्या पाळीव सहकाऱ्यांच्या हातून संदेशखलीमध्ये अनन्य प्रकारे अत्याचार करण्याची मालीका सुरुच आहे.हे अमानवी कृत्य असून निषेधार्थ बाब आहे.त्यामुळे सबंध देशातून त्या अमानुष घटना जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.याच अनुषंगाने दि.५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता माऊली मंगल कार्यालय भोकर येथे नवनेत्या श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमात संदेशखालीमध्ये होत असलेल्या अमानुष घटनांचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
तसेच श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व नांदेड मनपाच्या माजी महापौर मंगलाताई निमकर,नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई घिसेवाड-घुमनवाड,जिल्हा सरचिटणीस पूनमताई देशपांडे,तालुकाध्यक्षा कल्पनाताई भोसले,ओबीसी महिला अध्यक्षा ज्योती ताई तलकोकूलवार,तालुका सरचिटणीस भाग्यश्रीताई देशपांडे,भाजपा महिला भोकर शहराध्यक्षा सुनिता राचूटकर,अनिता जाधव,श्रद्धा देशमुख, मीनाताई चव्हाण यांसह असंख्य महिलांचा सहभाग असलेली ‘नारी शक्ती वंदन यात्रा’ भोकर तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली.यावेळी भाजपा महिला आघाडी, अनुसूचित जाती जमाती महिला आघाडी व सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन पाठविण्यात आले.त्या निवेदनात संदेशखालीमध्ये लहान मुले,मुली, महिलांवर प्रतिदिन अमानुष अत्याचार होत असून महिला व मुलींची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.आर्थिक,राजकीय व धार्मिक मुद्यांमध्ये तेथील महिलांचा साधन म्हणून अपमानजनक,दुर्दैवी व निंदाजनक वापर केला जात असल्याचा आणि त्या अनन्य अत्याचाराचा आम्ही तीव्र जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत असे म्हटले आहे.याच बरोबर पोलीस प्रशासन व राज्यकर्त्यांनी हा अमानुष अत्याचार तात्काळ थांबवावा व ‘त्या’ गुंड प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी केली असून हे तात्काळ न झाल्यास तेथील नाकर्ते सरकार विरुद्ध लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.तर सदरील निवेदन देतांना असंख्य महिला भगिणींसोबत भाजपाचे भोकर तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,सरचिटणीस रामकृष्ण ऊर्फ बाळा साकळकर,प्रा.डॉ.व्यंकट माने,सामाजिक समरसता मंचचे अनंता जोशी,प्रदेश का.सदस्य संतोष मारकवार,जेष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ चटलावार,सभापती जगदीश पाटील भोसीकर,भगवान दंडवे,शहराध्यक्ष विशाल माने,राजू देशपांडे, नारायण मामा सादुलवार यांसह आदींची उपस्थिती होती.