२१ हजार ५०० रुपयाची लाच घेतांना नांदेड मनपाचे सहाय्यक आयुक्त व लिपिक झाले जेरबंद

भुखंडांची गुंठेवारी करण्यासाठी लाचेचा श्रीखंड खाण्याचा डाव फसला…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : दोन भुखंडांची गुंठेवारी करून देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ सिडको येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी वसुली लिपीक यांनी २५ हजार रुपयांची मागणी भुखंड मालकाशी केली. तडजोडीअंती २१ हजार ५०० रुपयाची लाच भुखंड मालकाकडून स्विकारतांना उपरोक्त दोघेही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून भुखंड मालक हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा सतर्क कार्यकर्ता असल्याने भुखंडाचा श्रीखंड खाण्याचा त्यांचा डाव फसला आहे.दोन्ही लाचखोरांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले व त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ सिडको येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त पदावर संभाजी माधवराव काष्टेवाड हे कार्यरत आहेत.तसेच याच कार्यालयात प्रभारी वसुली लिपीक या पदावर महेंद्र जयराम पठाडे कार्यरत आहेत.तर नांदेड येथील भुखंड मालक तथा तक्रारकर्ते लक्ष्मीकांत ताटिपोमुलवार यांनी दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांना तक्रार दिली.त्यात तक्रारदारांनी असदवन येथे सन २०२१ मध्ये १२ भुखंड खरेदी केले होते.त्यापैकी भुखंड क्रमांक २ व ३ ची गुंठेवारी करण्यासाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ येथे जावून माहिती घेतली असता त्यांना हे भुखंड पुर्वीच्या मालकाच्या नावाने नोंदीत असल्याचे दाखवत होते.त्यामुळे सहाय्यक आयुक्त काष्टेवाड यांना ते भेटले असता त्यांनी बिल कलेक्टर महेंद्र पठाडे यांना भेटा,मी त्यांना सांगतो, त्याप्रमाणे पुर्तता करा,तुमचे पुढील काम योग्यरित्या होवून जाईल असे सांगितले.यानंतर बिल कलेक्टर महेंद्र पठाडे यांची भेट घेतली असता त्यांनी दोन भुखंडांचे २५ हजार रुपये लागतील त्यात भुखंडांच्या दोन पावत्या मिळतील आणि उर्वरीत पैसे काष्टेवाड आणि माझे असतील असे सांगितले होते. असे नमुद करण्यात आले होते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी केली.त्यावेळी महेंद्र पठाडे यांनी तक्रारदाराकडून पुर्वी मागितलेल्या २५ हजार रुपयांपैकी ३ हजार ४९९ रुपये घेऊन कर पावत्या दिल्या. त्यानंतर दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी संभाजी काष्टेवाड यांनी देखील पंचासमक्ष लाच स्विकारण्याचे मान्य केले.यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेड चे पोलीस अधीक्षक संदीप पालवे,अपर पोलीस अधीक्षक संजय तुंगार व पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली धुतराज यांच्या पथकाने या दोघांवर साफळा लावला. यावेळी दोन भुखंडांचे १३ हजार ६७० रुपये व भुखंडांची नामपरिवर्तन फिस आणि उर्वरीत ७ हजार ८३१ रुपये असे एकूण २१ हजार ५०० रुपये सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ येथे स्विकारतांना हे दोघे त्या साफळ्यात रंगेहाथ अडकले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात लाच घेतल्या प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तर सदरील कारवाईने लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की,कोणत्याही लोकसेवकाने,शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती,एजंट यांनी शासकीय काम करुन देण्यासाठी शासकीय फिस व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास जनतेने दुरध्वनी क्रमांक 02462-253512 किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.लाच देणे व घेणे हा गुन्हा असल्याने योग्य ती कारवाई केली जाईल.
भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी लोक यांच्या विरुद्ध आमचा लढा सदैव राहील-प्रशांत पोपशेटवार
भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा नांदेड कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत पोपशेटवार यांनी नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, नांदेड-वाघाळा महापालिका सिडको झोनचे उपरोक्त अधिकारी आणि कर्मचारी हे दोघे पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नव्हते.ंयांच्या विरुद्ध ही कारवाई करण्याची आमची कोणाचीही इच्छा नव्हती.परंतू सदरील अधिकारी व कर्मचाऱ्यांने लाच मागणीचा कळस गाठला होता.त्यांच्यावर काही राजकीय लोकांचा वरदहस्त होता त्यामुळे त्यांचे कोणीही काहीही करुन घेत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत आणि मागणी वाढत गेली होती.आमच्या जिल्हा कार्यकारीणीचे सदस्य असलेल्या भुखंड मालकासही त्यांनी नाहक त्रास देत शासन महसूलाव्यतिरीक्त पैशाची मागणी केली होती.त्यांनी दिलेल्या नाहक त्रासामुळे व न्याय मिळावा यासाठी आम्हाला नाईलाजाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी लागली.यात ते दोघेही लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले गेले असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आमचा लढा सदैव राहील,असे ही ते म्हणाले.