ॲग्रीस्टॅक युनिक फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी उपयुक्त-उप.वि.अ.प्रविण मेंगशेट्टी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार मार्फत विविध योजनांतर्गत सानुग्रह अनुदान,पीक नुकसान भरपाई अनुदान,पी. एम.किसान डीबिटी अनुदान यांसह आदींचा लाभ दिला जातो.हा लाभ आता ॲग्रीस्टॅक युनिक फार्मर आयडी कार्डद्वारे मिळणार असल्याने ते शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे कार्ड तात्काळ काढून घ्यावे,असे आवाहनपर मनोगत भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले.ते दि.८ मार्च रोजी भोसी ता.भोकर येथील आयोजित ॲग्रीस्टॅक(Agrstack) युनिक कार्ड नोंदणी शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशाने भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व भोकर तहसिल विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर उपविभाग आणि तालुक्यात दि.८ ते १३ मार्च २०२५ या कालावधीत ॲग्रीस्टॅक (Agrstack) युनिक कार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने दि.८ मार्च २०२५ रोजी भोकर तालुक्यातील जवळपास २५ गावांत या मोहिमेंतर्गत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भोसी ता.भोकर येथील आयोजित शिबिरात उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून,तर किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीरकर, भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक(Agrstack) युनिक कार्ड योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी व त्यावरील पीक व विविध योजनांना यूनिक फार्मर आयडी कार्डला जोडण्याची (लिंक करण्याची) मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आधार कार्ड सारखे मिळणार यूरिक फार्मर आयडी कार्ड मिळणार आहे.यासाठी दि.८ ते १३ मार्च २०२५ पर्यंत भोकर तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.दि.८ मार्च २०२३ रोजी भोसी ता.भोकर येथे नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीरकर म्हणाले की,ॲग्रीस्टॅक योजना ही एक क्रांतिकारक संकल्पना आहे.जी शेतकरी,ग्राहक,शेती माल विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते.यात सर्व शेतकरी बांधवांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल.आधार क्रमांक प्रमाणे हा unique क्रमांक असून एप्रिल २०२५ पासून शेतीविषय कोणतेही शासकीय लाभ घ्यायचे असतील तर हा क्रमांक अनिवार्य असणार आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.तर तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी सदरील फार्मर युनिक आयडी कार्ड काढण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत माहिती दिली.ती अशी…गावात फार्मर आयडी नोंदणी शिबिराचे आयोजन केले जात आहेत.यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीचा सातबारा किंवा नमुना ८ अ कागदपत्रे सोबत ठेवावेत. कारण जमिनीचा अधिकृत पुरावा आवश्यक आहे.आधार कार्ड जोडणी असलेला मोबाईल नंबर असावा,जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन जोडणी करून घ्यावी.शिबिरांची तारीख व ठिकाण जाणून घ्यावे व यासाठी गावातील महसूल अधिकारी किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.शिबिराच्या दिवशी हजर रहावे व वेळेत पोहोचून नोंदणी करून घ्यावी.असे आवाहन केले.तसेच शेतकऱ्यांनी आपापल्या गावचे कृषि अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी,तलाठी,सीएससी केंद्र किंवा आपले सरकार केंद्र यांच्याशी संपर्क साधून तात्काळ नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी पुढे म्हणाले की,महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक( Agrstack) युनिक कार्ड योजनेंतर्गत योजनेअंतर्गत तयार होणारे यूनिक फार्मर आयडी कार्ड हे भविष्यात शेतकऱ्यांसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे.जसे की,पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळविणे,किसान क्रेडिट कार्ड बनविणे,पीक विमा काढणे, त्या अंतर्गत परतावा मिळविणे यासाठी ते आवश्यक ठरणार आहे. शिवाय सरकारने जाहीर केलेली पिकांची नुकसान भरपाई मिळविणे,पीक व शेती विषयक सर्वेक्षण करून घेणे,शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करणे यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांतर्गत कृषि निविष्ठा व इतर सेवांचा लाभ मिळविणे,याच बरोबर सरकारलाही या यूनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची जमिन कुठे व किती आहे?,कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे याची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.या यूनिक फार्मर आयडी कार्ड च्या माध्यमातून सरकारला चालू हंगामात राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे ? याची माहिती देखील एका क्लिकवर मिळणार आहे.तसेच या योजने संदर्भात महसूल, कृषि आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येवून नोंदणीसाठी आधार क्रमांक मागितल्यास सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.सदरील शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळ अधिकारी एम.पी.मगरे,कृषि पर्यवेक्षक एस.यु.सूर्यवंशी, तलाठी एस.डी.केंद्रे,कृषि सहाय्यक एस.जी.सीतावार,पोलीस पाटील श्रीमती स्वाती कल्याणकर व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी परिश्रम घेतले.