Mon. Dec 23rd, 2024

हिंगणघाट जळीतकांड : प्राध्यापिकेच्या हत्या प्रकरणात विक्की नगराळे दोषी

Spread the love

प्राध्यापिकेच्या द्वितीय स्मृतिदिनी १० फेब्रुवारी रोजी न्यायालय देणार निकाल

अंबुज प्रहार प्रतिनिधी

वर्धा : प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे या दि.३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचल्या असता नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना वाटेत दबा धरुन बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यास त्या दिसताच त्याने तिच्या अंगावर दुचाकीतून काढलेले पेट्रोल ओतून पेटवून दिले.यात गंभीररीत्या भाजल्या गेल्याने उपचारादरम्यान जळीत प्राध्यापिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.संपुर्ण महाराष्ट्र हादरुन सोडलेल्या या  खळबळजनक जळीतकांड गुन्हे प्रकरणाची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट न्यायालयात सुनावणी पुर्णत्वास आली असून सदरील जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी ठरला आहे. तसेच उद्या दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली असून प्रा.अंकिता पिसुड्डे यांना जीवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे या आरोपीस न्यायालय काय शिक्षा देईल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

प्रा.अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या स्व.आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.प्रा.अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.प्रा. अंकिता पिसुड्डे या दि.३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचल्या.नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने त्या जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे ने प्रा.अंकिता पिसुड्डे या दिसताच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि पेटवून दिले होते.गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत प्रा. अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी या जळीत पीडित प्राध्यापिकेने अखेरचा श्वास घेतला व प्राणज्योत मालवली.आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने.प्रा.अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते.प्रा.अंकिताच्या दुर्दैवी मृत्यूला उद्या दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे तिच्या द्वितीय स्मृतिदिनी लागणाऱ्या या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मयत दुर्दैवी प्राध्यापिका…

या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता व सामाजिक संघटनांतून विविध आंदोलनांनी पडसाद उमटले होते.यामुळे सदरील प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या केवळ १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले.तसेच दि.२८ फेब्रुवारी २०२० रोजी या आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.

आरोपी विकेश नगराळे…

सामाजिक आंदोलने व लोक आग्रहामुळे सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे शासनाने घोषित केले.तसेच विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची या गुन्हे प्रकरणी नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली.दरम्यानच्या काळात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम,अ‍ॅड.दीपक वैद्य यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीच्या वतीने बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.भूपेंद्र सोने,अ‍ॅड. शुभांगी कोसार,अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी काम पाहिले.मा.न्यायालयात या प्रकरणी ६४ सुनावण्या झाल्या व २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.यात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे सबळ पुराव्यांनिशी दोषी ठरला आहे.

जळीतकांड घटनेपासून आरोपी विकेश नगराळे हा कारागृहातच असून हत्येचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाले आहे असे मा.न्यायालयाने म्हटलं आहे.परंतु,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवलं जातं तेव्हा शिक्षा देण्याकरता एक दिवसाची मुदत,शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे,आरोपीचं म्हणणं सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याबाबत एक दिवसाचा वेळ दिला जातो.त्यानुसार उद्या दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी मा.न्यायालयात आम्ही म्हणने सादर करु,असे विशेष वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी म्हटले आहे.तर त्यादृष्टीकोनातून न्यायालय उद्या आरोपीला काय शिक्षा देईल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !