हळदा येथे ट्रॅक्टर ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन स्वार ठार
नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करुन गावी परतणाऱ्या आजोबा व नातवाचा झाला दुर्देवी मृत्यू
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर-उमरी रस्त्यावरील मौ.हळदा ता. भोकर येथे दि.६ जानेवारी रोजी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस पाठीमागून दुचाकी जाराने धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या पवना ता.हिमायतनगर येथील दुचाकीस्वार आजोबा व त्यांच्या एकुलता एक असलेल्या नातवाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामा नरसप्पा पटपेवाड (७२) रा.पवना ता. हिमायतनगर हे हर्षवर्धन चंद्रकांत दंतुलवाड (२१)रा.चिंचळा ता.बिलोली ह.मु.पवना या नातवा सोबत दि.६ जानेवारी २०२३ रोजी तालुका उमरी येथील एका नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या दूचाकी क्र.एम.एच.२६ सी.सी.९७६७ वरून ते गावी पवना ता. हिमायतनगर येथे परत येत असताना रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान भोकर-उमरी रस्त्यावरील हळदा ता. भोकर येथे त्यांची दुचाकी ट्रॅक्टर क्र.एम.एच.२६ बी.क्यु. ०७५० च्या रिकाम्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडकली.त्या ट्रॉलीला कसल्याही रेडियम पट्टी व इंडिकेटर लावलेले नसल्यामुळे दुचाकीस्वारास ती ट्रॉली दिसली नाही आणि हा भिषण अपघात झाला.यात ते दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.यावेळी हळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धावून आले व त्यांनी तात्काळ सेवा ऍम्ब्युलन्स १०८ ला याबाबतची माहिती कळवली.यावरुन कर्तव्यावर असलेले भोकर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गणेश जंगीलावाड व चालक रवी वाठोरे हे दोघे ऍम्ब्युलन्स घेऊन अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहचले.परंतू ते दोघे अतिशय गंभीर जखमी झाले असल्याने घटनास्थळी अंबुलन्स पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

याबाबतची माहीती त्यांनी भोकर पोलीस व महामार्ग पोलीसांना दिल्यावरून भोकर पोलीस ठाण्याचे पो. उप.नि.अनिल कांबळे,महिला पो.उप.नि.राणी भोंडवे, सहाय्यक पो.उप.नि.श्यामसुंदर नागरगोजे,जमादार संभाजी देवकांबळे,पो.का.सय्यद मोईन,पोलीस मित्र मन्सूर पठाण,जुनेद पटेल,हे घटनास्थळी पोहचले. तसेच महामार्ग पोलीस,बारड चे जमादार संतोष निलेवार,पो. कॉ.बालाजी हिंगणकर,चालक पो.कॉ. विशाल ठाकूर घटनास्थळी पोहचले.पोलीस मित्र व नागरिकांच्या मदतीने दुचाकीस्वार त्या मयत दोघांचे मृतदेह उत्तरीय तापसणीसाठी ग्रामीण रुग्णालय,भोकर येथे आणण्यात आले.तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली भोकर पोलीसांनी ताब्यात घेतली असून रात्री उशिरा पर्यंत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.तर या भिषण अपघातात आजोबा व त्यांच्या एकुलता एक नातवाचा अशा प्रकारे अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.