हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करा -गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रेरित करावे व हर घर तिरंगा,घर घर तिरंगा मोहीम यशस्वी करावी,असे आवाहन भोकर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे यांनी केले आहे.
गटसाधन केंद्राच्या सभागृहात दि.४ ऑगस्ट २०२२ रोजी तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक यांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना एम.जी.वाघमारे म्हणाले की,येत्या दि.१५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघणार आहेत.प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे.आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्यात यावा.यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांत जनजागृती होणे गरजेचे असून त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा,असेही एम.जी.वाघमारे यांनी बैठकीत सांगितले आहे.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शिरसाट,केंद्रप्रमुख,केंद्रीय मुख्याध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.