‘हर घर तिरंगा’ उपक्रमातून भोकर तालुका होणार तिरंगामय
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे-उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे
भोकर तालुक्यातील २८ हजार घरांवर फडकणार आहे तिरंगा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र संग्रामातील ज्ञात अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा एक महत्वपुर्ण उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार असून यात नागरिक, देशभक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी केले आहे.
भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात दि.२२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमा संबंधित माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे,भोकर न.प.च्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,नायब तहसिलदार संजय सोलंकर,मंडळ अधिकारी महेश वाकडे,न.प.चे सुनील कल्याणकर यांसह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
उपस्थित पत्रकारांना माहिती देतांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे म्हणाले की,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.सदरील उपक्रमास ‘हर घर तिरंगा’ असे संबोधण्यात आले असून हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे.घर,इमारती,सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी आस्थापना,सहकारी संस्था आदी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करावयाचा आहे.या उपक्रमातून स्वातंत्र संग्रामातील ज्ञात अज्ञात नायक,क्रांतीकारक यांच्या आठवणींना उजाळा देत तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम जागृत ठेवण्याचा उदात्त हेतू आहे. त्यामुळे नागरिक व देशभक्तांनी स्वयंस्फुर्तीने यात सहभागी व्हावे आणि हा उपक्रम यशस्वी करावा,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
भोकर उपविभागात हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी भोकर व मुदखेड तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.तर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजेश लांडगे, भोकर न.प.च्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व त्यांची यंत्रणा परिश्रम घेत आहे.तर ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी harghartirangananded.in या लिंकवर नागरिकांनी आपली नोंदणी करावयाची आहे.तसेच या लिंकद्वारे स्वतः लावत असलेल्या व इतरांना देण्यात येणार असलेल्या ध्वजांची नोंदणी करावयाची आहे. तालुक्यातील नागरिकांना भोकर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आणि भोकर शहरातील नागरिकांना नगर परिषद कार्यालयात बचत गट यांच्यासह आदींच्या माध्यमातून प्रशासनाने ठरवून दिलेल्या किमतीत ‘तिरंगा ध्वज’ उपलब्ध होणार आहे. असे ते म्हणाले.
भोकर तालुक्यातील २८ हजार घरांवर फडकणार आहे तिरंगा
भोकर शहर व तालुक्यातील गावांत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार असून भोकर शहरातील ८ हजार व ग्रामीण भागातील २० हजार अशा जवळपास २८ हजार घरांवर ‘तिरंगा ध्वज’ फडकविण्याचा प्रयत्न होत आहे.तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्ती,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,स्वयंसेवी संस्था स्वइच्छेने सहभागी होत आहेत.शहरी भागात भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्याकडून २ हजार १७८ तिरंगा ध्वज घेण्यात येऊन नागरिकांना देण्यात येणार आहेत.तर बँक ऑफ बडोदा शाखा भोकर यांच्या वतीने २००,महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भोकरच्या वतीने १६०, वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने २००,तसेच भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने १०५ तिरंगा ध्वज देण्यात येणार आहेत.याच बरोबर ग्रामीण भागातून ७९ ग्रामपंचायतीतून सरपंच,ग्रामसेवक,स्वस्त धान्य दुकानदार,पोलिस पाटील यांसह आदी प्रतिष्ठित दानशूर व्यक्तींकडून तिरंगा ध्वजासाठी स्वयंस्फूर्तीने मदत होणार आहे.हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांचे योगदान राहणार असून इतरांनीही सहभागी होऊन देशभक्ती व राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.