हरभरा बियाण्यांसाठी महाडिबीटी वर अर्ज करावेत-विठ्ठल गिते
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- भोकर तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रब्बी पेरणी हंगाम सुरु होत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत कडधान्य पिकांमधील हरभरा बियाणे शासनाकडून अनुदान तत्वावर वितरण केले जाणार आहे.या बियाणांकरीता ईच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत प्रतिवर्षी विविध कडधान्य बियाणे अनुदानावर वितरित केले जातात.याच अनुषंगाने सन २०२२ च्या येत असलेल्या रब्बी हंगामामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत विविध पिकांतील कडधान्य अंतर्गत रब्बी पेरणीस्तव हरभरा बियाणे वितरण करण्यात येणार आहे.सदरील बियाणे उपलब्धतेसाठी इच्छुक शेताकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर प्रमाणीत हरभरा बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.भोकर तालुक्यांमध्ये हरभरा या पिकांसाठी विविध वाणांचे बियाणे उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज विजय २०२,फुले विक्रम व फुले विक्रांत या वाणांचा समावेश राहणार आहे. सदरील वाणांतील बियाणांची किंमत ७० रुपये प्रति किलो असेल व या हरभरा बियाणावर प्रति किलोस २५ रुपये आणि ४५ रुपये शासनाकडून अनुदान मिळणार आहे.तरी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी भोकर तालुक्यातील ईच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत हरभरा बियाणे साठी अर्ज करावेत व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या… http://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक / मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.