स्वारातीम विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचा प्रश्न सोडवू-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या शिष्टमंडळास केले आश्वस्त
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत असलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्राच्या मान्यतेच्या व निधी उपलब्धतेचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असून सन २०२२ मध्ये राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांनी सदरील केंद्र लवकरच सुरू करु असे आश्वासन दिले होते.परंतू त्या आश्वासनाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याने या प्रलंबित मागणी तात्काळ पुर्ण करण्यासाठीचे लक्षवेधी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्व. आनंद दिघे आनंदाश्रम,ठाणे येथे दि.२२ जानेवारी रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे व शिष्टमंडळाने दिले असून मुख्यमंत्री महोदयांनी याविषयात आम्ही विशेषत्वाने लक्ष घालून व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करुन हा प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवू,असे सदरील शिष्टमंडळास आश्वस्त केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्राची स्थापना करावी आणि विकास,विस्तारासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून राज्यातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना,पक्ष, समाज बांधव,विचार अनुयायी,साहित्यप्रेमींनी अनेक आंदोलनातून केली आहे.परंतू सदरील मागणीस दरम्यानच्या सर्वच सरकारने केराची टोपली दाखविली आहे. महाविकास आघाडी शासनातील तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा प्रलंबित प्रश्न आम्ही लवकरच सोडवू असे आश्वासन दि.१४ ऑगस्ट २०२१ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील कार्यक्रम प्रसंगी दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेले व आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले आहे.तत्कालीन मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळले गेले नाही.याचे स्मरण करुन देणे गरजेचे असल्याने अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे आणि शिष्टमंडळाने दि.२२ जानेवारी २०२३ रोजी राज्याचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्व.आनंद दिघे आनंदाश्रम,ठाणे येथे भेट घेऊन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्र,नांदेड च्या प्रलंबित मागणी विषयी एक ‘लक्षवेधी निवेदन’ दिले आहे.

त्या निवेदनात असे नमुद केले आहे की,महाराष्ट्रातील जागतिक किर्तीचे थोर साहित्यिक,संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचे अग्रणी नायक,मानवतावादी विचारवंत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गतचे अध्यासन व संशोधन केंद्र (Establishing of the sahityaratna Annabhau sathe Chair and Research center) स्थापन करुन तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावे.यासाठी विविध सामाजिक संघटना,विद्यार्थी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांचा पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वारातीम विद्यापीठ नांदेड अंतर्गत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्र मंजूर करुन लवकरच शासन स्तरावरून निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दि.१४ ऑगस्ट २०२१ रोजी स्वारातीम विद्यापीठाच्या कार्यक्रम प्रसंगी जाहीर केले होते.तसेच विद्यापीठ प्रशासनाकडूनही शासन स्तरावरून ‘Annabhau Sathe Chair at SRT university Nanded’ संदर्भीय पत्र व अन्य प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे.परंतू विद्यापीठ प्रशासनाकडून सादर केलेल्या प्रस्तावास शासनाकडून अद्याप मान्यता दिलेली नाही,ही वस्तुस्थिती आहे.सबब,आम्ही राज्यशासनास व आपणास विशेष विनंती करीत आहोत की,’स्वारातीम विद्यापीठ नांदेड अंतर्गत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्र मंजुरीची मागणी आणि तत्कालिन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यानी मंजूरीच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी,तसेच शासनामार्फत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासन केंद्र स्थापन करण्यासाठीचे धोरण विहीत करण्याबाबतचा शासन निर्णय दि.७ जून २०२२ च्या अगोदरचा असल्यामुळे अण्णा भाऊ साठे अध्यासन व संशोधन केंद्र स्वारातीम विद्यापीठ,नांदेड येथे तात्काळ चालू करण्यासाठी शासनस्तरावरून विशेषबाब म्हणून मान्यता देऊन त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आम्ही करीत आहोत,असे या निवेदनातून म्हटले आहे.

वरील आशयाचे लक्षवेधी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून यावेळी त्यांनी सतिश कावडे व शिष्टमंडळास म्हटले आहे की,सदरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही लक्ष घालू व विद्यमान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी याविषयी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ. यावेळी शिवसेना बाळासाहेबांची पक्षाचे कळमनुरी-हिंगोलीचे आमदार संतोष डांगर व आदी लोकप्रतिनिधींसह अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन च्या शैलेश सुन्नापोर व आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
