सौ.अनिता आमृतवाड व विश्वनाथ होळगे यांना सेवा समर्पण मराठवाडा स्तरीय पुरस्कार जाहीर
सेवा समर्पण परिवार भोकरच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा स्तरीय पुरस्कार वितरण, नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबीर आणि व्याख्यानाचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सेवा समर्पण परिवार भोकरच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा स्तरीय पुरस्कार वितरण, नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबीर आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून स्मार्ट व्हिलेज हाडोळी ता.भोकरच्या सरपंच सौ.अनिता माधवराव आमृतवाड यांना ग्राम सेवा समर्पण व दापशेड ता.लोहा येथील नैसर्गिक शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी विश्वनाथ गोविंदराव होळगे यांना कृषि सेवा समर्पण मराठवाडा स्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.दि.२९ मार्च रोजी एका भव्य अशा सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दि.८ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शैक्षणिक,जलसंधारण,ग्राम स्वच्छता व विकास, आरोग्य सेवा,वृक्षारोपण व संवर्धन अशा विविध क्षेत्रात निःस्वार्थ आणि समर्पित भावनेने सेवा कार्य करत असलेल्या भोकर येथील सेवा समर्पण परिवाराच्या तृतीय वर्धापन दिनाच्या औचित्याने या परिवाराच्या वतीने दि.२६ मार्च २०२२ रोजी स्मार्ट व्हिलेज हाडोळी ता.भोकर येथे नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातील तपासणीअंती मोती बिंदू व आदी दोष आढळलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तसेच दि.२७ मार्च २०२२ रोजी तहसिल कार्यालय भोकर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्ररोग तपासणी शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा व रक्तदात्यांनी रक्तदान करुन मानवसेवा आणि देशसेवा करावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.
याच बरोबर स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी सातत्याने अविरत व समर्पित भावनेने सेवाकार्य करणा-या स्मार्ट व्हिलेज मौ. हाडोळी ता.भोकरच्या सरपंच सौ.अनिता माधवराव आमृतवाड यांना ग्राम सेवा समर्पण मराठवाडा स्तरीय पुरस्कार आणि सन २०१४ पासून आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा न बाळगता विषमुक्त नैसर्गिक शेती करुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणारे दापशेड ता.लोहा येथील शेतीनिष्ठ शेतकरी विश्वनाथ गोविंदराव होळगे यांना कृषि सेवा समर्पण मराठवाडा स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.समर्पित भावनेने काम करणा-या या दोन व्यक्ती सेवा समर्पण परिवाराच्या मराठवाडा स्तरीय पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या असून प्रत्येकी रोख ११ हजार रुपये,मानपत्र, शॉल,स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात येणार आहे.दि.२९ मार्च २०२२ रोजी कैलासगड भोकर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या प्रसंगी भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामसुधारणा या विषयावर व्याख्यान होणार आहे.सदरील सोहळ्यास विविध क्षेत्रातील अधिकारी,लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड व सेवा समर्पण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.संपन्न झालेल्या पत्रकार परिषद समयी सेवा समर्पण परिवाराचे प्रा.डॉ.उत्तमराव जाधव,प्रा.नारायण कुमरे,प्रकाश देशमुख, विठ्ठल फुलारी,दिगंबर देशमुख, अनिल जाधव,डॉ.विश्वास धात्रक,गणेश लक्षटवार,गजानन रेड्डी,रवि देशमुख,किरण देशमुख,शरद.देशमुख यांसह आदींची उपस्थिती होती.
पुरस्कार सन्मानार्थी सरपंच सौ.अनिता माधवराव आमृतवाड आणि शेतीनिष्ठ शेतकरी विश्वनाथ गोविंदराव होळगे यांचे संपादक उत्तम बाबळे आणि अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने मनःपुर्वक अभिनंदन !