Mon. Dec 23rd, 2024

सामाजिक बांधीलकी जपणारा कलागुण संपन्न प्रा.शंकरराव थोरात-डॉ.जे.टी.जाधव

Spread the love

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथील विद्यार्थी प्रिय प्रा.थोरात हे दि.३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याच्या औचित्याने…

अंबुज प्रहार विशेष-प्रासंगिक

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा.शंकरराव थोरात तीस वर्षाच्या प्रदीर्घसेवे नंतर नियत वयोमाना प्रमाणे दि.३१ मार्च २०२२ रोजी सेवा निवृत होत आहेत.
     १९९३ जूलै पासून मी त्यांचा थेट सहकारी म्हणून वावरतो.या २९ वर्षात आमचा जो प्रवास आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा असाच आहे.खरं तर प्रा.थोरात अन माझी ओळख काही प्राध्यापक झाल्या पासूनचीच आहे असे नाही.एम.ए.करत असल्यापासून अर्थात १९९० पासूनच आमची घट्ट मैत्री.त्याचे अनेक पदर आहेत.

     आपल्या विषयाशी आपण प्रामाणिक राहिलो की, महाविद्यालया सोबत अन विद्यार्थ्यांच्या सोबत एक चिरंतन आपूलकीचं नातं वृद्धींगत होतं.अन् अत्यंत निर्मळ,नैसर्गिक असतं ते नातं.प्रा.थोरात सर तसे विद्यार्थीप्रिय शिक्षक.आपल्या वक्तृत्व शैलीने,अभ्यासपूर्ण विश्लेषणाने असंख्य विद्यार्थ्यांच्या अंतःकणावर अक्षरशः प्रा.थोरात सरांनी अधिराज्य गाजवलं.विद्यार्थ्यांप्रती असणारी कणव,जाणीव हा गुण सुध्दा प्रा.थोरात यांचा वाखाणण्या जोगा असाच आहे.जो प्राध्यापक विद्यार्थीप्रिय असतो तो आपल्या सहकाऱ्यांच्या मधे सुद्धा एक आपुलकीचं अन् जिव्हाळ्याचा विषय ठरत असतो.प्रा.थोरात यांचा स्वभाव तडजोडवादी नसून समन्वयवादी आहे.तडजोड ही स्वतःच्या मनाला मुरड घालून करावी लागते तर समन्वय हा दोघांच्या मनाचा सन्मान राखून साधायचा असतो.समन्वयाचा गुण प्रा.थोरात यांचा माझ्या मनाला फारच भावला.म्हणूनच आम्हा सर्व सहकाऱ्यांमधे प्रा.थोरात यांचं स्थान अधिक वरचं आहे.

     प्रा.थोरात यांच्या व्यक्तीमत्वाचा अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे ते हरहून्नरी कलासक्त कलावंत आहेत.उत्तम गायक,उत्तम हर्मोनियम वादक,उत्तम ढोलकीवादक,संगीताची उत्तम जाण. यात सर्वार्थाने परिपूर्ण.म्हणून १९९२ पासून आज पर्यंत महाविद्यालयाच्या प्रशासनाने ‘सांस्कृतिक’ विभाग त्यांच्याकडेच कायम ठेवला आहे.
प्रा.थोरात यांच्या स्वप्रयत्नाने आज पर्यंत महाविद्यालयाला विद्यापीठ स्तरावरील ‘युवक महोत्सवातील अनेक पारितोषिके सहजपणे मिळाली.
प्रा.थोरात सर यांच्या सहवासात येऊन भोकर आणि परिसरातील अनेक विद्यार्थी व्यवसायिक कलावंत उदयाला आले.हे नाकारता येत नाही.
अगदी लहाणपणा पासूनच प्रा.थोरात सर यांच्यावर भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे.
याच प्रभावातून अगदी बालवयापासूनच भजनी मंडळातून आंबेडकरी चळवळीचे गाणी गाऊन समाजप्रबोधनाचे मोलाचे काम केले.
आंबेडकरी चळवळीचा वारसा आजपर्यंत प्रा.थोरात सरांनी आजपर्यंत अव्याहत पणे सुरू ठेवला.म्हणून सामाजिक नाळ कायम टिकूण राहिली.
     विद्यार्थीप्रिय,सहकाऱ्यांमधे प्रतिष्ठा,सामाजिक बांधीलकीशी नाळ कायम जोडून असणारे प्राध्यापक म्हणून ओळख असणारे प्रा.थोरात शंकरराव आज नियत वयोमानाप्रमाणे आज सेवानिवृत्त होत आहेत.
वर्तमानात प्रा.थोरात सरांना उत्तम आरोग्य आणि भविषयात निरोगी उदंड आयुष्य मिळो.हिच या प्रसंगी मंगल कामना…

        प्रा.डॉ.जाधव जे.टी.
      दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर जि.नांदेड

प्रा.शंकरराव थोरात सरांना संपादक उत्तम बाबळे व परिवाराच्या मनःपुर्वक अनंत मंगल कामना !


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !