सहा.जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी भोकर तालुक्यातील एका आश्रम शाळेस ठोकले टाळे
आश्रम शाळांना अचानकपणे भेट देऊन तपासणी केली असता एकही विद्यार्थी व शिक्षक तेथे उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने केली ही धाडसी कारवाई
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटच्या प्रकल्प आधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दि.२० जानेवारी रोजी भोकर तालुक्यातील अनुदानित आश्रम व आदिवासी आश्रम शाळांना अचानकपणे भेटी देऊन तपासणी मोहीम राबविली असता एका शाळेत एकही निवासी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याने त्यांनी ‘त्या’ शाळेस(कार्यालयास)टाळे ठोकले असून सदरील धाडसी कारवाईने संबंधितात एकच खळबळ उडाली आहे.
भोकर तालुक्यात एकूण ७ अनुदानित आश्रम शाळा आहेत.सदरील शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग किनवट कार्यालयाच्या अधिपत्याखाली चालतात.सदरील कार्यालयाच्या अधिपत्याखालील काही शाळांतील त्रुट्यांविषयी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से.) यांना त्याबाबत काही गोपनीय माहिती देखील मिळाली होती.याच अनुषंगाने त्यांनी भोकर तालुक्यातील अनुदानित आश्रम (आदिवासी) शाळांना दि.२० जानेवारी २०२३ रोजी अचानकपणे भेटी देऊन त्या शाळांची तपासणी केली.यावेळी त्यांना अनुदानित आश्रम शाळा भोसी ता.भोकर येथील शाळेत एकही निवासी विद्यार्थी किंवा शिक्षक आढळून आले नसल्याचे समजते.ही धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्या शाळेच्या कार्यालयास सायंकाळी टाळे(सिल) ठोकण्याची कारवाई केल्याचेही समजते.तसेच रात्री उशिरा पर्यंत त्यांनी तालुक्यातील अन्य शाळांना देखील भेटी देऊन तपासणी केली.त्या तपासणीत काही शाळांचे कर्तव्य समाधानकारक असल्याचे समजले,तर काहींना त्यांनी योग्य अशा सुचना दिल्या असल्याचे ही समजले.तर त्यांच्याशी संवाद साधून टाळे ठोकल्याच्या त्या कारवाई बाबद विचारले असता त्यांनी सदरील कारवाई केली असल्याचे म्हटले असून आम्ही भोकर तालुक्यातील काही शाळा तपासणीची मोहीम राबविली आहे.त्यात ती गंभीर बाब निदर्शनास आल्याने आम्ही त्या शाळेच्या कार्यालयास तुर्तास टाळे ठोकले असून पुढील तपासणीत उचित कारवाई करण्यात येईल.असे ही त्यांनी म्हटले आहे.एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या प्रकल्प आधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी ही धाडसी कारवाई केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.