Mon. Dec 23rd, 2024

समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी पत्रकारांनी लेखणी झिजवावी-तहसिलदार राजेश लांडगे

Spread the love

स्वा.से.भुजंगराव पाटील किन्हाळकर कृषि विद्यालय व भाजपाच्या वतीने ही करण्यात आला पत्रकारांचा सन्मान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : हल्ली मानवांची मने कलूषित होऊन विषमतेची दरी निर्माण होत चालली आहे.ती दरी नष्ट करण्यासाठी चौथा स्तंभ पुढे आला पाहिजे व समाजातील ती विषमता नष्ट करण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी झिजवावी,असे विचार भोकरचे प्र.उपविभागिय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले.भोकर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित ‘दर्पण दिन-पत्रकार दिन’ कार्यक्रम प्रसंगी दि.६ जानेवारी रोजी विश्रामगृह भोकर येथे ते बोलत होते.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी पाहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु केले.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सन्मानार्थ ‘दर्पण दिन-पत्रकार दिन’ साजरा केला जातो.याच औचित्याने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.६ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे भोकरचे प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व भोकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि.रसूल तांबोळी, पो.उप.नि.राम कराड,वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे,वनपाल राठोड,पो.कॉ.विकास राठोड,पोलीस मित्र मन्सूर पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दर्पण दिन-पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा भोकर पोलीस ठाणे व वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने पुष्पहार,पेन, डायरी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे सचिव बालाजी नार्लेवाड यांनी पार्श्वभूमी विषद केली. तसेच सहाय्यक पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि.राम कराड,वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे,पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे,यासह आदींनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याविषयी व कार्यक्रमास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षिय समारोपात बोलतांना तहसिलदार राजेश लांडगे पुढे म्हणाले की,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ सुरू केले.त्याकाळी आपल्या देशावर इंग्रजांची जुलमी सत्ता राज्य करीत होती.तेव्हा ही सत्ता उलथून टाकण्यासाठी व भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी  लोकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे होते.याचा विचार करून त्यांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम केले.याचबरोबर समाजात असलेली अंधश्रद्धा,अज्ञान व विषमतेची दरी कमी करण्यासाठी त्यांनी आपली अमुल्य लेखणी झिजवली.त्यांचा आदर्श आजच्या काळात पत्रकारांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्या लेखणी द्वारे प्रखर, सत्याधिष्ठित विचार मांडावेत व सामाजिक,राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचे देशहितकारक काम करत रहावे.आज घडीला शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना कार्यान्वित आहेत,या योजनेची माहिती समाजाला नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत.तरी पत्रकारांनी आपल्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यां पर्यंत पोहोचवाव्यात,असे आवाहन ही त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा.आर.के.कदम यांनी केले.तर उपस्थितांचे आभार पत्रकार संघाचे संघटक सुधांशू कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,सहसचिव कमलाकर बरकमकर,विजय चिंतावार,सल्लागार विठ्ठल सुरलेकर, समन्वयक एजास कुरेशी,बालाजी कदम पाटील, अंबादास बोयावार, निळकंठ पडवळे,श्रीकांत बाबळे, प्रेस संपादक तथा पत्रकार से.संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे,पदाधिकारी सुभाष नाईक,दत्ता बोईनवाड, पत्रकार सुभाष तेले यांसह आदींची उपस्थिती होती.

स्वा.से.भुजंगराव पाटील किन्हाळकर कृषि विद्यालय व भाजपाच्या वतीने ही करण्यात आला पत्रकारांचा सन्मान

दर्पण दिन व पत्रकार दिनाच्या निमित्ताने स्वा.से. भुजंगराव पाटील किन्हाळकर कृषि विद्यालय व भाजपाच्या वतीने भोकर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा कोंडलवार,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे,संचालक राजू अंगरवार,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर,भाजपा शहराध्यक्ष विशाल माने,यांसह आदींची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार,डायरी,पेन देऊन उपस्थित पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्या प्रसंगी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे,पदाधिकारी बालाजी नार्लेवाड,गंगाधर पडवळे,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,कमलाकर बरकमकर, सुधांशू कांबळे,विजय चिंतावार,निळकंठ पडवळे, श्रीकांत बाबळे,प्रेस सं.व प.से.संघाचे उत्तम कसबे,सुभाष नाईक,दत्ता बोईनवाड,मराठी पत्रकार परिषदेचे ता.अध्यक्ष बी.आर.पांचाळ यांसह आदी पत्रकार बांधवांचा सन्मानार्थित सहभाग होता.या सोहळ्याचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार पत्रकार अनिल डोईफोडे यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !