समता पर्व निमित्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे झाले वितरण
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : समता पर्व सप्ताहनिमित्त शनिवार,दि.३ डिसेंबर रोजी यशवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात जवळपास २० विद्यार्थ्यांना जात पडताळणी समिचे अध्यक्ष प्रकाश खपले आणि समितीचे उपायुक्त डॉ. अनिल सेंदारकर यांच्याहस्ते जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आणि त्याबाबत मार्गदर्शन ही करण्यात आले.
यशवंत महाविद्यालय,नांदेड शनिवार,दि.३ डिसेंबर २०२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या विद्यमाने समता पर्व निमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात जात पडताळणी समितीचे उपायूक्त तथा सदस्य डॉ. अनिल शेंदारकर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, इयत्ता ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची तयारी म्हणून जात प्रमाणपत्र मिळताच त्यानंतर वैधता प्रस्ताव दाखल करावेत. मंडणगड पॅटर्ननुसार सर्वांना पंधरा दिवसात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळून जावू नये, व्यवस्थित व अचूक माहिती भरावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
तर समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया सोपी आहे़. सर्वांना जात वैधता कमीत कमी वेळेत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.एकही विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही.त्यासाठी इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी दि.३१ जानेवारी २०२२ पर्यंत आपले प्रस्ताव कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सोनू दरेगावकर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.कविता सोनकांबळे यांनी केले.यावेळी डॉ.डी.ई. कूपुलवाड,गजानन पाटील,शिवाजी मदेवाड,वडजे, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी,कर्मचाऱ्याची बहुसंख्येने उपस्थित होती.