सजीव शब्द साहित्य संपदेचे श्रीमंत धनी अण्णा भाऊ साठे – उत्तम बाबळे
भोकर बस आगारात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य संपदेतील प्रत्येक शब्द,ओळ सजीव आहे.त्या सजीव शब्दांनी त्यांच्या साहित्यातील ‘फकिरा’ सह अनेक नायक,नायीकांना अजरामर केले आहे.ती सजीव शब्द साहित्य संपदा आज जगातील अनेक देशांत विविध भाषेतून भ्रमण करत आहे.म्हणूनच अण्णा भाऊ साठे हे सजीव शब्द साहित्य संपदेचे श्रीमंत धनी आहेत,असे प्रतिपादन साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,भोकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने दि.१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेल्या जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,भोकर आगारातील अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांची,तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जळबाजी गायकवाड,नामदेव वाघमारे,शाहीर के.वाय.देवकांबळे,सौ.राजश्री ब्राम्हणे-भालेराव,सेवानिवृत्त कर्मचारी हैबते,सायलू काळे, शिवकुमार गाडेकर,संतोष सुर्यवंशी,दिवटे यांसह आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भोकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत,यशवंत पाल्यांचा ‘फकिरा’ ही कादंबरी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर जळबाजी गायकवाड,के.वाय. देवकांबळे यांनी प्रकाश टाकला.तर अध्यक्षिय समारोप आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांनी केला.तसेच प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,महान साहित्यिक तथा संयुक्त महाराष्ट्राचे अग्रणी नेते अण्णा भाऊ साठे यांनी उगीच नाही म्हटलं होतं की,’यह आझादी झुठी है,देश की जनता भुखी है !’ त्यांनी सत्य वदन केल्याचा प्रत्यय देश स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पुर्ण झाल्यावर ही पदोपदी येत आहे.आजही देशात महिला,गरीब,शोषित,पिडीत,दलित,वंचितांवरील अन्याय अत्याचार होणे थांबले नाहीत.मणिपूर मध्ये महिला भगिणींची नग्न धिंड काढल्याची घटना अगदी ताजी आहे,ही निषेधार्थ व लज्जास्पद बाब आहे. यामुळेच प्रश्न पडतो की खरच येथील काही नागरिकांना लोकशाहीत स्वातंत्र्य मिळाले आहे काय ? म्हणूनच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी उद्गारलेल्या उपरोक्त शब्द,ओळी व त्यांची साहित्य संपदा आजही सजीव असल्याचे तुम्हा आम्हास मान्य करावेच लागणार आहे.असे ही ते म्हणाले.
संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक, सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.एस. चटलावार यांनी केले.तर सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी भोकर आगारातील पाळी प्रमुख एन.जी. ठाकूरवाड,यु.जी.शकदम,जे.ए.सुर्यवंशी,आर.एस. पवार,आर.एन.गजभारे,एन.एस.पोतरे,एम.व्ही.मोरे,बी.पी.शिवेवार,एम.पी.वन्ने,एस.एम.सोनकांबळे,एस.डी. ससाने,आर.बी.सोनटक्के,एन.एच.वाघमारे,डी.बी.मेकाले,पी.डी.संत्रे,व्ही.के.ढवळे यांसह आदींनी परिश्रम घेतले.या सोहळ्यास आगारातील चालक,वाहक, यांत्रिकी यांसह बहुसंख्य महिला,पुरुष कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.