संवाद कौशल्याने जीवन सुखकर होण्यास मदत होते-डॉ.हनुमंत भोपाळे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वाचन,भाषण,संवाद ही भाषिक कौशल्ये साध्य करण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम घेतले पाहिजे.
भाषिक कौशल्ये अभ्यासाने,सरावाने साध्य होतात.
संवाद कौशल्य उत्तम केल्यास वादाचे अनेक प्रसंग टाळता येतात.संवाद कौशल्य नातेसंबंधात गोडवा निर्माण करते.मित्र,नातेवाईकांचे जाळं निर्माण करण्याची क्षमता संवाद कौशल्यात आहे.एवढेच नव्हे तर संवाद कौशल्य जीवन सुखकर करण्यासाठी कामी येते,असे प्रतिपादन व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले.दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,भोकर. जि.नांदेड आणि उच्च शिक्षण विभाग भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” या निमित्ताने भाषिक कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर ऑनलाईन बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र चौधरी हे होते. डॉ. भोपाळे पुढे बोलताना म्हणाले की,अर्थपूर्ण वाचनाने जाणिवांच्या कक्षा रुंदावत जातात.परिस्थिती आणि व्यक्तीचे आकलन होण्यास मदत होते. वाचनातून मिळालेला अनुभव आपले अनुभव विश्व समृद्ध करण्यास मदत करतो.प्रतिकूल परिस्थितीतही माणसं न डगमगता वाटचाल करण्यासाठी वाचणातून मिळालेल्या ज्ञान आणि अनुभवाची मदत होते. लोकशाहीत यशस्वी नेतृत्व म्हणून जगासमोर येण्यासाठी संवाद आणि भाषण कौशल्याची गरज आहे.ज्यांना यशस्वी नेता व्हायचे आहे,त्यांनी भाषण आणि संभाषण कौशल्य साध्य करण्याचा सल्ला डॉ.भोपाळे यांनी दिला.मराठी माणूस समृद्ध झाल्यास भाषा भौगोलिक क्षेत्र विकसित होण्यासाठी कशी मदत होते हेही त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.राजेंद्र चौधरी यांनी मराठी माणसाला मोठं करून भाषेला मोठं करता येते असे सांगून डॉ.हनुमंत भोपाळे यांनी मांडलेल्या चिंतनशील भाषणातून दिशा मिळते असे सांगितले.सुत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.टी.जाधव यांनी केले.