संगणकीय प्रशिक्षण हे काळाची गरज आहे-राजेंद्र खंदारे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सध्याचे विज्ञान युग हे स्पर्धेचे झाले असून या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज झाले आहे,असे प्रतिपादन भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी व्यक्त केले.ते भोकर येथे दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेतर्फे आयोजित विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संगम फंक्शन हॉल भोकर येथे दि.२४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एम.के.सी.एल.चे नांदेड जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकरचे प्रा.एस.पी.काळे, महाराष्ट्र राज्य शासन मान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेचे प्रवक्ते सुभाष पाटील यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना राजेंद्र खंदारे पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करायचे असले तरी प्रत्येक क्षेत्रात आता संगणकाचे ज्ञान अत्यंत आवश्यक झाले आहे.त्याशिवाय तुम्ही या संघर्षमयी स्पर्धेच्या युगात टिकू शकणार नाही.तसेच वैयक्तिक जीवनातही दैनंदिन व्यवहार सुरळीत पणे करायची असतील तरीही संगणकांचे ज्ञान अत्यंत आवश्यक बनले आहे.त्याच अनुशंगाने दिशा कॉम्प्युटर संस्थेतर्फे शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना माफक दरात संगणकीय ज्ञान उपलब्ध करून दिल्या जाते हे अभिमानास्पद असून त्याबद्दल या संस्थेचे मी एक अधिकारी म्हणून कौतुक करतो व आभार ही व्यक्त करतो, असे ही ते म्हणाले.
सोहळ्याच्या प्रारंभी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा संयोजका तर्फे यथोचित सत्कार करण्यात येवुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी उपरोक्त मान्यवरांनी सोहळ्यास अनुसरुन व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील असे विचार मांडले.तसेच विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे प्रास्ताविक दिशा कॉम्प्युटर चे संचालक मारुती गायकवाड यांनी केले तर सुरेख असे सूत्रसंचालन व अभार प्रा.सोनकांबळे यांनी मानले.या सोहळ्यास भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,उपाध्यक्ष प्रा.आर.के. कदम,कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,बाजार समिती संचालक रामचंद्र मुसळे,जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,अनिल डोईफोडे यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक,पालक वर्ग व विद्यार्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.