श्री शाहू भोकरच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘गेट टुगेदर’ ने केले नववर्षाचे स्वागत!
सन १९९४-इयत्ता १० वी च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी २८ वर्षानंतर झालेल्या स्नेहभेटीतून दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर जि.नांदेड च्या सन १९९४ -इयत्ता १० वी च्या बॅच मधील १२५ माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर भोकर येथे एकत्र येऊन दि.१ जानेवारी रोजी ‘गेट टुगेदर’ ने नववर्षाचे स्वागत केले व झालेल्या स्नेहभटीतून अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. तसेच गुरुजणांच्या सन्मान सोहळ्याने या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते.त्याच जाणीवेतून श्री लाल बहाद्दूर शास्त्री शिक्षण संस्था,उमरी संचलित भोकर येथील शिक्षण क्षेत्रातील उज्वल यशाची परंपरा राखलेल्या श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेच्या सन १९९४-इयत्ता १० वी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर एकत्र येण्याचे ठरविले.आणि ते पण नववर्षाचे औचित्य साधून.तसेच इयत्ता १० वी वर्गातील अविस्मरणीय आठवणींची शाळा मनात भरवत माजी विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’ व गुरुजनांचा सन्मान सोहळ्याच्या औचित्याने दि.१ जानेवारी २०२२ रोजी हे जवळपास १२५ माजी विद्यार्थी गणराज रिसोर्ट व मंगल कार्यालय भोकर येथे ते एकत्र आले.
स्वागत,नोंदणी,परिचय,गुरुजणांचा सन्मान सोहळा, सामुहिक भोजन आणि जुण्या आठवणींना मनोगतातून उजाळा देणे अशा विविध सत्रांनी संपन्न झालेल्या ‘गेट टुगेदर’ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेची मुहूर्तमेढ रोवणारे प्रथम मुख्याध्यापक नंदकुमार तुप्तेवार हे होते.तर सन्मानार्थी म्हणून माजी मुख्याद्यापिका सौ.स्वाती शिराढोणकर-कुलकर्णी,गुरुवर्य हाडोळे व तत्कालीन अन्य गुरुजणांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदरील गेट टुगेदरला एकूण १२५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.विशेष बाब म्हणजे यात ५० महिलांची उपस्थिती होती.या सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजणांचा यथोचित सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी माजी विद्यार्थी निषिकांत तुपतेवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यक्रम आयोजनाची पार्श्वभूमी विषद केली.यावेळी जुण्या आठवणींना उजाळा देतांना माजी विद्यार्थी न्यायाधीश सुनील हाके हे मनोगत म्हणाले की,आमच्या शैक्षणिक जीवनाचा भक्कम पाया याच शाळेतून भरला गेला असल्याने आम्ही आज अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभे आहोत.त्यामुळेच ही शाळा, शिक्षकवृंद व हे गाव आम्ही विसरु शकत नाही.कारण या शाळेची व भोकरशी आमची नाळ जोडलेली आहे.तर माजी विद्यार्थी डॉ.प्रल्हाद राठोड हे म्हणाले की,या शाळेच्या शिकवणीचे ऋण आम्ही कदापिही फेडू शकत नाही.परंतू काही सामाजिक उपक्रम जर येथे राबविले गेले तर आम्ही नक्कीच त्यात सहभागी होऊ व खारीचा वाटा उचलू. तसेच माजी विद्यार्थी तथा भोकर येथील प्रसिद्ध उद्योजक देवानंद धुत यांनी तर काही कवितांच्या सादरीकरणातून शाळेतील जुन्या आठवणी जाग्या करत एक औरच रंगत आणली.याच बरोबर वर्ग मित्र डॉ.किशोर राठोड यांनी दिलेल्या सेवाकार्याची आठवण करुन देतांना अनेक शिक्षकांना व मित्रांना त्यांचा कसा फायदा झाला ? हे सांगितले.आणि एका रुग्णास या डॉ.मित्राने आपल्या अथक उपचारातून मृत्यूच्या दारातून वापस आणून जीवनदान दिल्याची आठवण ही यावेळी करुन दिली.याच बरोबर या शाळेने आम्हास काही सेवा करण्याची संधी दिली तर विद्यार्थीउपयोगी उपक्रम राबऊ असे ते म्हणाले.या कार्यक्रमात उपस्थित राहू न शकलेल्या माजी विद्यार्थीनी प्रज्ञा जोशी यांनी थेट अबू धाबीहुन व्हिडीओ कॉलद्वारे मनोगत व्यक्त करुन सहभाग नोंदविला. अध्यक्षीय समारोप करतांना गुरुवर्य नंदकुमार तुप्तेवार म्हणाले की,हल्ली अनेकजण आपल्या आई- वडीलांची सेवा करत नाहीत व वृद्धाश्रमात पाठवितांना पहावयास मिळत आहे.परंतु माझे विद्यार्थ्यी हे सुसंस्कारीत असल्यानेच आज आमच्या सारख्या गुरुजणांचा आदर सन्मान करत आहात.यातुन ते नकीच आपल्या आई-वडील यांची सेवा करणारेच आहेत अशी माझी खात्री आहे.हे सेवा कर्तव्य बजावणाऱ्यास आयुष्यात काहीही कमी पडत नाही,असे ही ते म्हणाले.
सन १९९४-इयत्ता १० बॅचच्या या माजी विद्यार्थ्यांत न्यायाधीश,वकील,डॉक्टर,इंजिनिअर,प्राद्यापक,शिक्षक, उद्योजक,व्यापारी,विविध कार्यालयीन क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी,शेतकरी आदींचा समावेश असून या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन २०२१ या वर्षाला निरोप देत जुण्या अविस्मरणीय आठवणी उजाळा देत नुतन वर्ष २०२२ चे स्वागत केले.अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या ‘गेट टुगेदर’ सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन डॉ.किशोर राठोड यांनी केले.तर या माजी विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवात शाळेचे अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही बहुसंख्येने सहभाग नोंदविला.तर या गेट टुगेदरच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.