शिवसेना भोकर तालुका प्रमुख अमोल पवार उद्या मुख्यमंत्री शिंदे गटात
शहर प्रमुख माधव बिल्लेवाड यांसह आदींचा ही होणार प्रवेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार आपल्या गटात घेऊन सत्तांतर केले आहे.सत्तांतरा अगोदर व नंतर ही शिंदे गटात (सेनेत)शिवसैनिक सहभागी होण्याचा ओघ सुरुच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्या दरम्यान उद्या दि.८ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे भोकर तालुका प्रमुख अमोल धनराज पवार व भोकर शहर प्रमुख माधव बिल्लेवाड यांसह आदींचा मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती अमोल पवार यांनी दिली आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी यांनी आपल्या समर्थक ४० आमदारांना घेऊन आपला वेगळा गट तयार केला व भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने राज्यात सत्तांतर केले. सत्तांतराने ते राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.याच दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले व सत्तांतरानंतर नांदेड निवासी व जिल्ह्यातील जुने शिवसैनिक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील हे देखील सहभागी झाले.शिवसेनेत विविध कारणावरून नाराज असणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा सपाटा सुरुच आहे.दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या एकदिवशीय दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार हेमंत पाटील यांना मानणारे अनेक शिवसैनिक आहेत.त्यातीलच भोकर तालुका प्रमुख अमोल पवार हे एक आहेत.त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असल्याची संधी साधून शिवसेनेचे भोकर तालुका प्रमुख अमोल धनराज पवार,शहर प्रमुख माधव बिल्लेवाड यांसह आदी शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित या दौऱ्यात उद्या नांदेड येथे मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार आहेत.अमोल पवार व माधव बिल्लेवाड यांनी दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली असून प्रवेशाची वेळ निश्चित केली आहे,अशी माहिती अमोल पवार यांनी दिली आहे.
यापुर्वी जेष्ठ शिवसैनिक नारायण पाटील सोळंके पोमनाळकर हे मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला ही झाला होता,असे त्यांनी सांगितले होते.अमोल पवार,माधव बिल्लेवाड व नारायण पाटील सोळके यांनी तालुक्यात अनेक शाखा स्थापन केल्या आहेत.हे पाहता या प्रवेशानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार हेमंत पाटील यांचे पाठबळ अधिकतेने मिळणार आहे व तालुक्यात अधिक जोमाने विकासात्मक कामे करता येणार आहेत.यामुळेच आम्ही मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी होत आहोत व याच बरोबर काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिंदे शिवसेना वाढीसाठी परिश्रम घेणार आहोत,असे अमोल पवार यांनी म्हटले आहे.