शिवसेना ठाकरेंची बुलंद तोफ पुन्हा धडाडणार;मग जल्लोष तर होणारच-माधव पाटील
खा.संजय राऊत यांना जामीन मंजूर ; भोकर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आतिषबाजी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांना व शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.म्हणून शिवसेना ठाकरे गटाची बुलंद तोफ तुरुंगाबाहेर आल्यावर पुन्हा धडाडणार,मग जल्लोष तर होणारच! असे शिवसेना ठाकरे गटाचे भोकर तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर यांनी म्हटले असून भोकर मध्ये त्यांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मिठाई वाटून,ढोल ताशा आणि आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा केला आहे.
गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला कथित पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते.यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे समोर आले आहे.गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला.जवळपास १ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार होता.खा.संजय राऊत हे या व्यवहाराचे मास्टरमाईंड होते,असा आरोप ईडीने त्यांच्यावर व प्रविण राऊत यांच्यावर केला आहे. सदरील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने दि.३१ जुलै २०२२ रोजी खा.संजय राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी व त्यानंतर दोनदा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात होती.आज दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी खा.संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयालयाने अखेर २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर व चौकशीसाठी जेव्हा बोलावले जाईल तेव्हा यावे लागेल अशा काही अटीवर जामीन मंजूर केला आहे.तसेच प्रविन राऊत यांना देखील जामीन देण्यात आला आहे.जामीन मिळताच या निर्णयाला स्थगिती द्यावी,अशी मागणी ईडीने पीएमएलए न्यायालयाला केली होती.परंतू ईडीची ही मागणी पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावली.
खा.संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने भोकर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोकर तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हा प्रमुख सतिश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मिठाई वाटली.तसेच ढोल ताशाच्या गजरात व भव्य आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.यावेळी तालुका प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांना या आनंदोत्सवाबाबद विचारले असता त्यांनी म्हटले आहे की,प्रखड व सत्य बोलणारा आमचा हा नेता १०२ दिवसांनी तुरुंगाबाहेर येत आहे.त्यांच्या विरुद्ध शडयंत्र रचून ही कारवाई करण्यात आली आहे.परंतू आज न्याय देवतेने न्याय दिला असल्याने आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. आमची ही बुलंद तोफ पुन्हा धडाडणार असल्याने ही आतिषबाजी त्यांच्या स्वागतासाठी आहे.असे ही त्यांनी म्हटले आहे.या आनंदोत्सवात उपरोक्तांसह शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,महिला आघाडीच्या आनंदाबाई चुनगुरवाड, माजी उपतालुका प्रमुख बालाजी येलपे,युवासेना तालुकाधिकारी आनंद पाटील हासापुरकर,उपतालुका प्रमुख संतोष आलेवाड,बालाजी येलपे,वामन महाराज पर्वत, विशाल बुद्धेवाड,परमेश्वर राव,गजानन तंवर,गजू मेटकर, साई म्हस्के,रवी वर्षेवर,काशिनाथ शिंदे,रमेश कोकणे,वसंत जाधव, संजय जाधव महागावकर,परमेश्वर संगेवार,यांसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.