Mon. Dec 23rd, 2024

शिक्षणविस्तार अधिकारी किशनराव सोनटक्के यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

Spread the love

हाळदा ता.भोकर शिक्षण संकुलाच्या वतीने करण्यात आले होते या सन्मान सोहळ्याचे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात सेवारत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी किशनराव सोनटक्के यांची नियतवयोमानाने दि.३० नोव्हेंबर रोजी सेवापुर्ती झाली.शिक्षण विभागात त्यांनी केलेल्या सेवापुर्तीच्या अनुषंगाने हाळदा ता.भोकर शिक्षण संकुलाच्या वतीने शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिकांच्या वतीने दि.७ डिसेंबर रोजी त्यांचा भव्य सेवापुर्ती सन्मान सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्वांनी मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या सेवापुर्ती सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी माधव जी.वाघमारे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच माधवराव नागमोड, माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड, मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख नागनाथ ईबितवार, सुधांशु कांबळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी किसनराव सोनटक्के हे शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघाळी येथे दि.८ नोव्हेंबर १९८५ रोजी शिक्षण सेवेत रुजू झाले.यानंतर जिल्ह्यातील माळकौठा, लामकाणी,नागेली,हाडोळी येथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द पार पाडली.नंतर पदोन्नतीने  शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम पाहिले.तब्बल ३७ वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करुन दि.३० नोव्हेबर २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले.त्यांनी अधिकांश सेवाकाळ हाळदा शिक्षण संकुलात घालवला.या अनुषंगाने हळदा शिक्षण संकुलाच्या वतीने दि.७ डिसेंबर २०२२ रोजी हाळदा ता.भोकर येथे भव्य सेवापुर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनाने सुरुवात करण्यात आलेल्या या सेवापुर्ती सन्मान सोहळ्याच्या प्रास्ताविकातून शिक्षक जोंधळेंनी किशनराव सोनटक्के यांनी शिक्षण सेवेत दिलेल्या योगदानाविषयीची यशस्वी कारकीर्द विषद केली.तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बालाजी नार्लेवाड,सरपंच माधवराव नागमोड,मोरे गुरुजी,राठोड गुरुजी,शिंदे गुरुजी,शिक्षिका मंडलापुरे व मुख्याध्यापक नागनाथ ईबितवार यांनी आपल्या मनोगतातून किशनराव सोनटक्के यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.तसेच त्यांचे भावी आयुष्य निरामय, निरागस,सुखकर व आनंदाचे जावो आणि त्यांच्या हातून अखंड समाजसेवे बरोबर राष्ट्रसेवाही घडत रहावी अशा शुभेच्छा दिल्या. अध्यक्षिय समारोपात गटशिक्षणाधिकारी माधव.जी. वाघमारे यांनी किशनराव सोनटक्के यांच्या यशस्वी शिक्षण सेवाकार्यावर प्रकाश टाकला व त्यांनी केलेले भरीव कार्य आणि यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य असून ते सर्वांना प्रेरणादायी असणार आहे असा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तर सत्कारमुर्ती किशनराव सोनटक्के हे सत्कार सोहळ्यास उत्तर देताना म्हणाले की,माझ्या सेवाकाळात वेळोवेळी मला सर्व शिक्षक वृंद, मित्रमंडळी,अधिकारी वर्ग व विशेष करून ज्या ज्या गावांमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली तेथील सर्व गावकऱ्यांनी मला सहकार्य केले आहे.त्याबद्दल मी त्या सर्वांचा सदैव ऋणी राहील.यावेळी बोलतांना ते व त्यांची पाठवणी करतांना उपस्थित सर्वजण भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले.

किशनराव सोनटक्के हे अतिशय शांत,संयमी, मितभाषी स्वभावाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व कर्तव्य कठोर आधिकारी म्हणून परिचीत होते.त्यांनी सेवा काळात आनेक विद्यार्थ्याना घडवण्याचे अतुल्य कर्तव्य बजावले असल्यामुळे या सोहळ्यास हाळदा संकुलातील केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, शिक्षिका,विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठीत नागरिकांची बहुसंख्येने उटस्थिती होती.सेवापुर्ती सन्मान सोहळ्याचे सुरेख असे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक विपीन पवनकर यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !