लाच प्रकरणी भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना दिली १ वर्षांची शिक्षा
एक जण पोलीस नायक तर दुसरा पोलीस पाटील असून उपरोक्त शिक्षेसह दोघांनाही लावला प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सन २०१६ मध्ये भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेल्या एका पोलीस नायकाने व लगळूद ता.भोकर येथील तत्कालीन पोलीस पाटलाने एका गुन्ह्यातील आरोपीस लॉकअप मध्ये टाकण्याची भिती दाखवून आणि लवकर जामीन करुन देतो असे सांगून पारितोषण म्हणून ५ हजार रुपयांची लाच घेतली होती. सबळ पुराव्यांनी ते दोषी सिद्ध झाल्यावरुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. वाय.एम.एच. खरादी यांनी दि.११ ऑगस्ट रोजी उपरोक्त दोघांनाही १ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
लगळूद ता.भोकर येथील शेतकरी दिगांबर गणपत बागडे यांच्या विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात त्यांना अटक करुन लॉकअप मध्ये टाकण्याची भिती दाखवून व लवकर जामीन करुन देण्याचे सांगून त्या गुन्ह्यांचे तपासणीक पोलीस नायक शिवराज विश्वांबर टरके यांनी दिगांबर बागडे यांना पारितोषणापोटी ५ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबद दिगांबर बागडे यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड यांच्याकडे रितसर तक्रार केली होती.यावेळी पंचासमक्ष तडजोडी अंती ५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले व लोकसेवक लगळूदचे तत्कालीन पोलीस पाटील संजय उमाकांत राजुरे यांनी तक्रारदार यांच्या कडून ५ हजार रूपये घेऊन शिवराज टरके यांना देऊन जामीन करून घेण्याचा पाठपुरावा करतांना दि.२९ जुलै २०१६ रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग,नांदेड च्या पोलीस पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.तसेच तत्कालीन पोलीस नायक शिवराज टरके व पोलीस पाटील संजय राजुरे यांच्या विरुद्ध भोकर पोलीसात गु.र.नं.१७२/ २०१६,कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याच्या सखोल तपासाअंती लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड चे तपासिक अंमलदार दयानंद मुरलिधर सरवदे यांनी विशेष खटला क्र.०६ /२०१६, शासन वि.शिवराज टरके व ईतर असे दोषारोपपत्र भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले.दरम्यानच्या काळात मा.न्यालयाने सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षिदार तपासले.तसेच आरोपीचे वकील व सरकारी अभियोक्ता ॲड.सौ.शैलजा अनिल पाटील यांच्यात झालेला युक्तीवाद आणि सबळ पुराव्यांवरून उपरोक्त दोन्ही लोकसेवकांनी सरकारी परिश्रमिके शिवाय पारितोषण म्हणून स्वतःसाठी पैशाच्या स्वरुपात लाभ तथा लाच मिळविण्याची कृती केल्याचे सिद्ध झाले.यावरुन ते दोघे दोषी ठरल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.वाय.एम.एच.खरादी यांनी दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस नायक शिवराज विश्वांबर टरके व पोलीस पाटील संजय उमाकांत राजुरे यांना कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्ये १ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास साध्या कारावासी शिक्षा सुनावली आहे.तर न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून प्रदिप कंधारे यांनी काम पाहिले आहे.