लहान भावाने मोठ्या भावास विष पाजून जीवे मारण्याचा केला प्रयत्न
रायखोड येथे ऐन दिवाळीच्या सणात दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याची घडली दुर्दैवी घटना
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील रायखोड येथील शेतकरी कुटूंबातील दोन सख्ख्या भावांत शेतीचा वाद विकोपास गेल्याने लहान भावाने पत्नी व मुलाच्या मदतीने मोठ्या भावास जीवे मारण्याच्या हेतूने जबरदस्तीने विष पाजले.पिडीत मोठा भाऊ यातून सुदैवाने बचावला असून लहान भाऊ,त्याची पत्नी व मुलाविरुद्ध भोकर पोलीसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी कुटूंबातील लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड व सुर्यकांत माधवराव आलेवाड दोघे ही राहणार मौ.रायखोड ता.भोकर या सख्ख्या भावांत काही दिवसांपासून वडीलोपार्जीत शेतीचा वाद होता.दि.२२ ऑक्टोबर २०२२ रोजी मोठा भाऊ लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड हा आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बसला असता दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान लहान भाऊ सुर्यकांत माधवराव आलेवाड,त्याची पत्नी गोदाबाई सुर्यकांत आलेवाड व मुलगा देवराव सुर्यकांत आलेवाड हे मोठा भाऊ एकटा असल्याचे पाहून तेथे आले आणि शेतीच्या पैशाबाबद वाद घातला.यावेळी मोठ्या भावाने त्यास सांगितले की,मी पंचासमक्ष तुला १५ लाख रुपये दिलो आहे. त्यामुळे आता मी तुझे काहीही देणे नाही.परंतू लहान भावाने मोठ्या भावाचे काही एक ऐकूण घेतले नाही व हा वाद विकोपाला गेला.हा वाद सुरुच असतांना लहान भाऊ,त्याची पत्नी व मुलाने मोठ्या भावास दाबून धरले आणि त्यांच्या जवळील विषाची बॉटल उघडून ते विष जबरदस्तीने मोठ्या भावास पाजले.तसेच तो बेशुद्ध पडत असल्याचे पाहून ते तिघेजण पसार झाले.काही वेळाने झालेला प्रकार मोठ्या भावाच्या कुटूंबियांना माहित झाल्याने त्यांनी तात्काळ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले.तेथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारार्थ त्यांची नांदेड येथे रवानगी केली.नांदेड येथे त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने सुदैवाने ते बचावले.
उपचारानंतर पिडीत शेतकरी लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड यांनी भोकर पोलीसात रितसर फिर्याद दिल्यावरुन उपरोक्त लहान भाऊ,त्याची पत्नी व मुलगा या तिघांविरुद्ध गुरनं ४०५/ २०२२ कलम ३०७,५०४,५०६,३४ भादवि प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पिडीत शेतकऱ्याच्या घरी व घटनास्थळी भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीम. शफकत आमना(आय.पी.एस.) यांनी भेट दिली असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.राम नामदेव कराड व पो.ना.रवि मुधोळे हे करत आहेत.