रेणापूरच्या १० कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी केले स्थलांतरित
सुधा प्रकल्पाखालील नदीच्या पुराचे पाणी शिरले होते ‘त्या’ घरांत
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अतिवृष्टी झाल्याने नद्या,नाले,ओढे दुथडी वाहत असून तालुक्यातील सर्वात मोठा पाणी साठवण तलाव सुधा प्रकल्प हा तुडूंब भरला आहे.त्यामुळे सुधा प्रकल्पाखालील मौ.रेणापूर गावातील काही घरांत सुधा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे.घरात पाणी शिरलेल्या त्या १० कुटूंबीयांना महसूल विभागाने दि.१२ जुलैच्या रात्री सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.तर त्या घरांतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने जीवित हाणी टळली आहे.
मागील ६ दिवसांपासून पावसाने जोर धरला असून तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे नद्या,नाले,ओढे दुथडी भरुन वाहत आहेत व या पुराचे पाणी शेतात शिरल्याने अनेक गावांतील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व काही गावांचा संपर्क ही तुटत आहे.तर नदी शेजारील काही गावात पुराचे पाणी शिरत आहे.त्याच अनुशंगाने महसूल विभाग व आपत्कालीन व्यवस्थापन मदतकार्य पथके सज्ज आहेत.तालुक्यात एकमेव सुधा नदी मोठी असून या नदीवर धानोरा तलाव व सुधा प्रकल्प आहे. सुधा नदीला पूर आला असून नदी लगतच्या मौ. बोरगाव (सुधा) या गावचा संपर्क तुटत आहे.तर सुधा प्रकल्प ही तुडूंब भरला असून सुधा प्रकल्पातील पाण्याचा सांडव्यावरुन मोठा विसर्ग होत असल्याने सुधा नदीला पूर आला आहे.या पूराचे पाणी प्रकल्पाखालील मौ.रेणापूर गावातील काही घरात शिरत आहे.ही माहिती मिळाल्याने भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे,गटविकास अधिकारी अमित राठोड,नायब तहसिलदार रेखा चामणर,तलाठी राधा खुळे यांनी दि.१२ जुलै २०२२ रोजी दुपारी रेणापूर गावास भेट दिली व याबाबदची पाहणी करुन गावकऱ्यांना सुरक्षिततेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला.
दिवसभर सततधार पावसाने जोर धरला आहे.त्यामुळे रेणापूर मधील नदी काठच्या काही घरात पाणी शिरले. सदरील पूर परिस्थितीवर तलाठी राधा खुळे व आदी महसूल कर्मचारी लक्ष ठेऊन होते.रात्री उशिरा एकूण १० घरात पुराचे पाणी शिरले असल्याची माहिती तलाठी राधा खुळे यांनी तात्काळ वरीष्ठांना दिली.यावरुन मंडळ अधिकारी महेश वाकडे,कोतवाल राहुल कदम हे रेणापूर येथे गेले व पूर परिस्थिती पाहिली असता त्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.नागरिकांची कसलीही जीवित हाणी होऊ नये म्हणून त्या १० कुटूंबातील ३३ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतला व जि.प.शाळेच्या इमारतीत त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.यामुळे अनुचित प्रकार टळला.तसेच त्या नागरिकांना आवश्यक ती साधन सामग्री व अन्न धान्य देण्यात आले.याकामी रेणापूरचे स्वस्त धान्य दुकानदार अनिल बिरगाळे,पोलीस पाटील सुर्यवंशी व आदी गावकऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.तर तलाठी राधा खुळे यांनी रेणापूर येथे तळ ठोकून वेळीच पूर परिस्थितीची माहिती वरिष्ठांना दिल्यामुळे संभाव्य अनुचित प्रसंग टळला.तसेच पाऊस सुरुच असल्याने पूराचे पाणी वाढत आहे.त्यामळे काही अनुचित प्रकार होऊ नये व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वेळीच हलविता यावे यासाठी मंडळ अधिकारी महेश वाकडे व तलाठी राधा खुळे या पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.