Mon. Dec 23rd, 2024

राज्यात राबविण्यात येणार कॉपीमुक्तीचा नांदेड पॅटर्न

Spread the love

कॉपी होतांना निदर्शनास आल्यास ‘त्यांची’ गय केली जाणार नाही – तहसिलदार राजेश लांडगे

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : सन २०१० मध्ये तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून कॉपीमुक्ती पॅटर्न राबविण्यात आला होता.सदरील पॅटर्नचा प्रयोग अतिशय यशस्वी झाला होता.तोच पॅटर्न राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्या होऊ घातलेल्या सर्व परिक्षा केंद्रावर यावर्षी राबविण्यात येणार असून भोकर तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर सदरील पॅटर्नची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याने ज्या परिक्षा केंद्रांवर कॉपी होतांनाचे निदर्शनास आल्यास त्याची गरज केली जाणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल,अशी माहिती भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी भोकर येथे संपन्न झालेल्या तालुका कॉपीमुक्ती दक्षता समितीच्या आढावा बैठकी दरम्यान दिली आहे.

इ.स.२००९-१० या काळात नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कॉपी प्रकरणाची दखल घेवून इ.स.२०१० साली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते.या अभियानातंर्गत १० वी व १२ वी परिक्षा केंद्रांवर प्रवेशावेळी परिक्षार्थींची झडती घेणयात आली होती.यासाठी पोलीस पाटील,कोतवाल,शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी तर अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करण्यात आली होती.तसेच महसूल विभागाचे पूर्णवेळ बैठे पथक,संवेदनशिल परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे,भरारी पथकामार्फत पोलीस,महसूल प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे,काही विशेष पथकाव्दारे अचानक तपासणी करणे आदी प्रकारे मोहीम राबविण्यात आली होती.याच बरोबर इंग्रजी,गणित आणि विज्ञान पेपरसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आकस्मिक भेटीही करण्यात आल्या होत्या.सन २००८ मध्ये १० वीच्या परिक्षेचा निकाल ८७ टक्के, २००९ मध्ये ९० टक्के लागला.वरील प्रकारे अभियान राबविण्यात आल्यानंतर मार्च २०१० मध्ये निकाल ३१ टक्क्यावर आला.तर २००८ मध्ये १२ वीचा निकाल ९२ टक्के,२००९ मध्ये ८२ टक्के लागला.तो २०१० साली २५ टक्क्यावर आला.तर ऑक्टोबरच्या पुरवणी परिक्षेचा निकाल २४ टक्क्यांवरुन ७ टक्क्यावर घसरला होता.तसेच ज्या अतिसंवेदनशिल केंद्रावर पाळत ठेवण्यात आली होती तेथील निकाल ५० टक्क्यापेक्षा खाली घसरला होता.सन २०११ मध्ये हाच निकाल ४१ टक्क्यावर घसरला होता.त्यानंतर या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा मार्च २०१३ मध्ये दहावीचा निकाल ७४ टक्के तर बारावीचा निकाल ९० टक्क्यावर पोहचला. सन २०१५ मध्ये १० वीचा निकाल ८१ टक्के तर १२ वीचा निकाल ९१ टक्के,सन २०१६ मध्ये १० वीचा निकाल ७४ टक्के, तर १२ वीचा निकाल ८५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

याच दरम्यान नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे बदली झाली होती.गेली पाच वर्ष पंतप्रधानांचे शैक्षणिक सल्लागार म्हणून श्रीकर परदेशी यांनी काम पाहिले आहे.माघील वर्षी मुंबई मंत्रालयात ते रुजू झाले आहेत.कोरोना काळातील ऑनलाईन परिक्षांसह गेल्या ३ वर्षातील निकालाचा त्यांनी अभ्यास केल्यानंतर राज्य शासनाला कॉपीमुक्तीचा पॅटर्न संबंध राज्यात लागू करण्याची सूचना केली आहे.त्यानुसार यावर्षीच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावीपणे राबविण्यात यावा,असे आदेश राज्य शासनाचे अव्वर सचिव विजय भोसले यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आले आहेत.त्यानुसार कॉपीमुक्तीचा हा नांदेड पॅटर्न आता राज्यभर लागू होणार असून,जिल्हा,तालुका व गावपातळीवर सदरील कॉपीमुक्ती अभियान जनजागृतीसाठी महसूल,शिक्षण,पोलीस विभाग व आदी अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यात येत आहेत.

दि.२१ फेब्रुवारी २०२३ ते दि.२१ मार्च २०२३ दरम्यान इयत्ता १२ वीच्या,तर दि.२ मार्च २०२३ ते दि.२५ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता १० वीच्या परीक्षा होणार आहेत.याच अनुषंगाने व उपरोक्त कॉपीमुक्ती अभियान भोकर तालुक्यात राबविण्यात येणार असल्याच्या संदर्भाने दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी भोकर पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार राजेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक विकास पाटील,गटविकास अधिकारी अमित राठोड, गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. होऊ घातलेल्या परिक्षा संदर्भात आढावा घेतांना गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे यांनी जिल्ह्यात १२ वीसाठी ९२,तर १० वीसाठी १६० परिक्षा केंद्रे आहेत.तसेच भोकर तालुक्यात इयत्ता १२ वीसाठी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर,कै. लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर,श्री शाहू महाराज विद्यालय भोकर ह्या ३ परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात आली असून सदरील ठिकाणी सुमारे १ हजार २६२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.तर इयत्ता १० वीसाठी,श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर,जिल्हा परिषद हायस्कूल भोकर, मंजुळाबाई किनाळकर विद्यालय भोकर,कै. लक्ष्मणराव पाटील हासेकर विद्यालय लगळुद,संत गाडगेबाबा आश्रम शाळा साळवाडी,कै. लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर ह्या ६ परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली असून सदरील ठिकाणी १ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.तसेच सदरील परिक्षा केंद्रांवर होणारी परिक्षा कापीमुक्त व्हावी यासाठी प्रशासनाकडून योग्य ते नियोजन व उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.तर पोलीस निरीक्षक विकास पाटील यावेळी म्हणाले की,या अभियानांतर्गत ह्या केंद्रांवर परीक्षेच्या काळात १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्राच्या ५० मीटर आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या सभोवताली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून प्रामुख्याने इंग्रजी,गणित आणि विज्ञान पेपरसाठी विशेष काळजी घेवून नजर ठेवली जाणार आहे. तसेच परिक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडत असल्यास याची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी,गैरप्रकार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल,असे ही ते म्हणाले.तर अध्यक्षिय समारोपात बोलतांना तहसिलदार राजेश लांडगे यांनी वरील पार्शवभूमीवर उपस्थित ३२ माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,९ केंद्रप्रमुख,४ विस्तार अधिकारी व १० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्राचे ९ केंद्र संचालक यांना परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावविरहित वातावरणात निर्विघ्न पार पाडण्यासाठीच्या महत्त्वपुर्ण सूचना दिल्या आहेत.सदरील आढावा बैठकीचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी एल.पी.सुरकार यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख शेख जकियोद्दीन बरबडेकर यांनी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !