राजवाडी तांडा येथे ट्रक उलटला;यात ३ जण ठार,तर २५ जण जखमी
मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर होत आहेत उपचार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुदखेड : जाजवाडी तांडा ता.मुदखेड जवळ हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी माल घेऊन विक्रीसाठी जात असलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांचा मालवाहू आयचर ट्रक दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान उलटला असून या भिषण अपघातात ३ जण जागिच ठार झाले आहेत.तर जवळपास २५ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.या सर्व जखमींवर मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हिमायतनगर आठवडी बाजारात माल विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांनी भरलेल्या मालवाहू आयचर ट्रक क्र.एम.एच.०४ जी.एफ- २७०५ च्या चालकाचा ट्रक वरील ताबा राजवाडी तांडा ता.मुदखेड येथील रस्त्यावरील नाल्याजवळ सुटला व एका खड्ड्यात चाक गेल्याने तो ट्रक उलटला.यात तीन जण जागीच ठार झाले असून जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील,मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा,बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुगावे,पो.उप.नि.सुभाष वानोळे यांच्यासह बारड आणि मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी तात्काळ पोहचले व त्यांनी राजवाडी तांडा येथील नागरिकांच्या मदतीने त्या मयतांना आणि ट्रकखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून बचावासाठी प्रयत्न केला.तसेच जखमींना उपचारार्थ मुदखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील किरकोळ व्यापारी हे जिल्हाभरातील सर्व आठवडी बाजारात माल विक्री करण्यासाठी जात असतात.यात भाजीपाला,धान्य,कपडे, आदी विक्रेत्यांचा समावेश असतो.आज देखील नेहमीप्रमाणे बुधवार,दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ते उपरोक्त ट्रकने हिमायतनगर येथील आठवडी बाजारसाठी जात असतांना राजवाडी तांडा ता.मुदखेड जवळ येताच त्यांच्या ट्रक चालकाचा एका नाल्याजवळ गतीवरील ताबा सुटला व चाक एका मोठ्या खड्ड्यात गेल्याने तो ट्रक उलटला.या भिषण अपघातात महंमद हाफिज महंमद हुसेन,मोहम्मद रफीक मोहम्मद अमीन साहब, महंमद चांद महंमद मीरासाहब हे तीन व्यापारी जागिच ठार झाले.तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत.या जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या अपघाताबाबत मयत व जखमींच्या नातेवाईकांना समजताच त्यासर्वांसह अनेक नागरिकांनी रुग्णालयात धाव घेऊन एकच गर्दी केली आणि महिलांनी तर काळीज पिळवटून टाकणारा एकच हंबरडा फोडला होता.