Mon. Dec 23rd, 2024

मौ.दिवशी खु.येथे विज पडून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

तर पिंपळढव येथे विज पडून दोन शेतकरी महिला जखमी…

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील मौ.दिवशी (खु.) येथील एक शेतकरी महिला ही दि.१९ सप्टेंबर रोजी आपल्या शेतात कामासाठी गेली असता विजेच्या गडगडासह अचानक सुरु झालेल्या परतीच्या पावसात तिच्यावर विज पडली व यात तिचा जागिच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नैसर्गिक आपत्तीत या शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तर पिंपळढव ता.भोकर येथे विज पडून दोन महिला जखमी झाल्या आहेत.

मौ.दिवशी (खु.) ता.भोकर येथील वर्षा शंकर तीगलवाड (४१) ही शेतकरी महिला दि.१९ सप्टेंबर रोजी मौ.लगळूद शिवारातील गट क्र.२१९ मधील त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गेली असता दुपारी ४:४५ वाजताच्या दरम्यान विजेच्या गडगडासह अचानक परतीचा पाऊस सुरु झाला. यावेळी ती शेतातील एका झाडाचा आसरा घेण्यासाठी थांबली असता सुरु झालेल्या पावसात त्या झाडावर विज कोसळली व ती विज तिच्यावर पडली.यात तिचा जागिच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या पश्चात पती,३ मुली असा मोठा परिवार असून नैसर्गिक आपत्तीत अशाप्रकारे तिचा आकस्मित मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ही बातमी लिहत असतांना भोकर तहसिलचे मंडळ अधिकारी सौ.सविता कुसळे व तलाठी राजकुमार मस्के, तलाठी व्ही.आर.डांगे हे घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी रितसर पंचनामा केल्याची माहिती तहसिलदार राजेश लांडगे यांनी दिली असून ते पोहचण्या अगोदरची उपरोक्त माहिती दिवशी खु.येथील चेअरमन तथा प्रतिष्ठित नागरिक गंगाधर महादवाड यांनी आम्हास दिली आहे.

तर पिंपळढव येथे विज पडून दोन शेतकरी महिला जखमी…

पिंपळढव ता.भोकर येथील वंदना बळीराम कंधारे(१८) व पद्मावती सत्यजित जाधव(३०) या दोघी पिंपळढव शिवारातील त्यांच्या शेतात कामासाठी गेलेल्या असतांना दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान विजांच्या गडगडापासह सुरु झालेल्या परतीच्या पावसात त्या शेतातील लिंबाच्या झाडावर विज पडली व त्या झाडाजवळ थांबलेल्या या दोघी यात जखमी झाल्या आहेत.त्यांना उपचारार्थ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.तर दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी विज पडून याच गावातील एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज घडलेल्या आस्मानी संकटातून सुदैवाने या दोघी बचावल्या आहेत,अशी माहिती पिंपळढवचे पोलीस पाटील शिलानंद गायकवाड यांनी दिली आहे.

विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेस संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !