मैदानी खेळांतून मिळणारी निरोगी शरीर संपत्ती ही अमुल्य!-राजेंद्र खंदारे
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या ग्रेड बेल्ट विरतरण व सत्कार सोहळ्यात ७० खेळाडूंना विविध ग्रेड बेल्ट वितरित करण्यात आले.
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्थावर,जंगम संपत्ती कितीही असेल आणि शरीर निरोगी नसेल तर ही संपत्ती कधी कधी अपुरी पडते.परंतू तंदुरुस्त व निरोगी शरीर असेल तर ती संपत्ती खुपच मोलाची असते,तसेच ती व्यायाम आणि मैदानी खेळांतून मिळवता येते.म्हणून मैदानी खेळांतून मिळणारी निरोगी शरीर संपत्ती ही अमुल्य असते आणि ती आपण शारीरिक खेळांतून मिळवत आहात,असे प्रतिपादन भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी व्यक्त केले आहे.मिशन मार्शल आर्ट्स,वुशू,कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया शाखा,भोकर व ऑल नांदेड जिल्हा तेंग-सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ मार्च रोजी आयोजित ग्रेड बेल्ट वितरण आणि सत्कार सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मिशन मार्शल आर्ट्स,वुशू,कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया शाखा,भोकर व ऑल नांदेड जिल्हा तेंग-सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१३ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मंजुळा नगर मैदान,भोकर येथे ग्रेड बेल्ट वितरण आणि खेळाडूंचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी सोहळ्याचे उद्घाटन म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे होते.तर अध्यक्षस्थानी मिशन मार्शल आर्टस वुशू कुंग-फु कराटे असोसिएशन इंडिया चे अध्यक्ष मास्टर पवन व्ही.घुगे हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे, मंजुळाबाई किन्हाळकर मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील,डॉ.राठोड,अशोक निळकंठे,पत्रकार पि.एल.गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती.
यावेळी कराटे प्रशिक्षक व पंच बालाजी एल.गाडेकर यांनी प्रशिक्षित केलेल्या व विविध खेळांत निपुण झालेल्या यशवंत अशा खेळाडूंनी चित्त थरारक असे प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थित मान्यवर,पालकवर्ग व प्रेक्षकांचे मन प्रसंन्न केले.यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळात प्राविण्य आणि यश मिळविलेल्या खेळाडूंचा पालकांसह यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंना प्रमाणपत्र व विविध ग्रेड बेल्टचे वितरण करण्यात आले.
यात कु.राणी तिरुपती जाधव(जि.प.प्रा.कें.शाळा नूतन, भोकर),कु.आदिती प्रविणराव बोरकर(केंद्रीय विद्यालय एस.सी.आर.नांदेड),सुहान अयुब शेख(ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल,भोकर),रितेश शांतीभूषण बबीलवाड( ऑक्सफर्ड इंगलिष स्कूल,भोकर) या चार राज्य व राष्ट्रीय पातळीवरील रग्बी खेळाडूंचा,तर खराटे मधील ब्लॅक बेल्ट प्राप्त कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण व शंतनू भानुदास बामणे या दोन खेळाडूंचा विशेषत्वाने समावेश आहे.नांदेड जिल्ह्यातील तैंग सू डो रेफ्री आणि राष्ट्रीय रग्बी स्पर्धेतील खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच ग्रेड बेल्ट वितरणात ३९ यलो बेल्ट,१० ऑरेंज बेल्ट, १२ ग्रीन बेल्ट,१ ब्ल्यू बेल्ट,२ पर्पल बेल्ट,२ ब्राउन बेल्ट,२ ब्लॅक बेल्ट अशा एकूण ७० जणांचा समावेश आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना पो.नि.विकास पाटील म्हणाले की,भोकर सारख्या ठिकाणी अशा प्रकारचे गुणसंपन्न खेळाडू निर्माण होत आहेत.आता प्रत्येक खेळास महत्व प्राप्त झालेले असून नौकरी क्षेत्रात खेळाडूंना ५ टक्के आरक्षण दिल्या जात आहे.त्यामुळे खेळाडूंनी अशा प्रकारच्या विविध खेळांत श्रम घेऊन सहभागी होऊन यश मिळविलेच पाहिजे.तर अध्यक्षीय समारोपात मास्टर पवन व्ही.घुगे म्हणाले की,गेल्या ७ ते ८ वर्षापासून कराटे प्रशिक्षक व पंच बालाजी गाडेकर यांच्या अथक प्रशिक्षण परिश्रमातून ग्रामीण भागातील खेळाडू आम्ही घडवित आहोत.त्याचीच फलश्रुती आज आपण सर्वजण या रुपाने पाहत आहोत.
तर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे पुढे म्हणाले की,ग्रामीण भागातील साहित्य,साधने,मैदान व आदींचा अभाव असतांनाही कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी यावर मात देत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे.ते कौतुकास्पद व अभिनंदनिय असून प्रशासन स्तरावर त्यांना जे सहकार्य करता येईल ते आम्ही नक्कीच करु.तसेच इंटरनेट व मोबाईल च्या युगात आपल्या पाल्यांना अडकवून न ठेवता शारीरिक खेळांत निपुण करण्याचे महत्वपुर्ण प्रशिक्षण देण्याचे काम हे पालक करत असल्याने त्यांचे देखील मी अभिनंदन करतो,असे ते यावेळी म्हणाले. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या ग्रेड बेल्ट विरतरण व सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक,सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंजुळाबाई किन्हाळकर मुलींच्या शाळेचे क्रीडा प्रशिक्षक कुमरे यांनी केले.