मी कुठेही असेन चिंता करु नका तुम्हाला काही कमी पडणार नाही-अशोकराव चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भावनिक साद घालत भोकर येथे व्यक्त केलेल्या याच वक्तव्याची अनेकांतून झाली एकच चर्चा…
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भोकर दौरा केल्याच्या दुस-या दिवसीच माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांनी दि.६ सप्टेंबर रोजी भोकर दौरा केला.आ. अशोकराव चव्हाण हे भाजपात जाणार आहेत ? याबाबद सर्वत्र होत असलेल्या पक्षांतरच्या वल्गना व चर्चेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते काय बोलणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. परंतू त्यांनी कोणावरही टिका टिप्पणी न करता किंवा त्याबाबदचे स्पष्टीकरण न देता…’मी कुठेही असेन चिंता करु नका तुम्हाला काही कमी पडणार नाही, त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही!” अशी भावनिक साद घालत हे व्यक्तव्य केले.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकरच्या मोंढा व्यापारपेठेतील ‘लिलाव शेडच्या’ लोकार्पण सोहळ्यात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उपस्थितांतील काहींनी ते असे का म्हणाले असतील ? यावर प्रश्नचिन्ह उभे केले.तर काहींनी ते लवकरच पक्षांतर करतील असे संकेत या सुतोवाचातून दिले असतील का ? अशी एकच चर्चा केल्याचे निदर्शनास आले आहे.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बुथ सशक्तीकरण अभियानाच्या अनुशंगाने दि.५ सप्टेंबर २०२२ रोजी भोकर तालुका दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी चिदगिरी, सोनारी,सावरगाव मेट,कांडली,श्री गणेश मंदिर पाळज व नवा मोंढा भोकर येथी सार्वजनिक गणेश मंडळास भेट दिली आणि श्री गणेशाची आरती केली.यानंतर शासकीय विश्रामगृह भोकर येथे पत्रकार परिषद घेतली.यादरम्यान आ. अशोकराव चव्हाण हे भाजपात येणार आहेत काय ? याबाबद अनेकांनी त्यांना विचारले.यावर त्यांनी म्हटले की, आ.अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेतील बहुमत चाचणी समयी आमच्या पक्षास अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले आहे.त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले आहेत व पक्षश्रेष्ठीने त्यांना प्रवेश दिला तर त्यांचे स्वागतच करेन.तसेच गेल्या काही दिवसांपासून आ.अशोकराव चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार आहेत ? असे अनेक माध्यमांतून चर्चेत आले आहे. यामुळे पक्षातील कार्यकर्ते व भोकर मतदार संघातील जनता संभ्रमावस्थेत आहे.असे असतांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसीच आ. अशोकराव चव्हाण दि.६ सप्टेंबर २०२२ रोजी भोकर तालुका दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी पाळज येथील श्री गणेश मंदिरास भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व २ कोटी रुपये खर्च करुन भक्तांसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यानंतर त्यांनी भोकर येथील कैलास गडावरील श्री गणेश मुर्ती विसर्जण करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक तलावाची पाहणी केली.
याच बरोबर डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकरने मोंढा व्यापारपेठेत १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करुन शेतकरी व व्यापारी यांचा शेती उत्पन्न माल सुरक्षित रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या ‘लिलाव शेडचे’ त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यानंतर याच ‘लिलाव शेडमध्ये स्थापित सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाचे त्यांनी दर्शन घेतले व श्रीमद भागवत कथा सोहळ्यातील सौ. रूपाली दीदी सवणे यांच्या मंजुळ वाणीतून प्रकटलेल्या श्री कृष्ण जन्म कथेचा श्रवणानंद घेतला.यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर,माजी जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड,बाळासाहेब देशमुख बारडकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,उपसभापती गणेश राठोड,ओबीसी नेते नामदेव आयलवाड, संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, रामचंद्र मुसळे,बाबूराव सायाळकर,काँग्रेसचे शहराध्यक्ष खाजू इनामदार,सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष दिलीप सोनटक्के,देवानंद धुत, व्यापारी असोशिएशन चे अध्यक्ष रावसाहेब पाटील लामकाणीकर,संचालक अप्पा राव राठोड,सतिश देशमुख,माजी सरपंच शिवाजीराव पांचाळ, बाबूराव आंदबोरीकर,बाजार समितीचे सचिव पुरभाजी पुंजेकर,श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी यांसह आदींची उपस्थिती होती.
एकूणच आ.अशोकराव चव्हाण हे भाजपा प्रवेश करणार आहेत ? अशा वल्गनेची चर्चा सर्वत्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी ते काय बोलणार ? याकडे भोकर तालुक्याचे लक्ष लागले होते.परंतू ‘लिलाव शेडच्या’ लोकार्पण सोहळ्यास संबोधित करतांना उद्योजक देवानंद धुत यांचे प्रास्ताविक व सभापती जगदीश पाटील भोसीकर यांच्या मनोगताचा धागा पकडून कोणावरही टिका टिप्पणी केली नाही किंवा पक्षांतरासंदर्भात स्पष्टीकरण दिले नाही.या ऐवजी संबोधित करतांनाच्या वक्तव्यातून उपस्थितांना भावनिक साद मात्र घातली.यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”विशेषतः मी जे बोलतो ते बोलायच्या अगोदर करतो व नंतर बोलतो. बोलुन ते नकरता नंतर आश्वासने देणारा मी नाही,येथील माणसांच्या मनाच्या चेहऱ्यावरील आनंद मी पाहतोय.तो आनंद आजचा नाही तर गेल्या पाच सात वर्षात मी त्यांच्या आशिर्वादाने काम करतोय,मला आशिर्वाद त्यांनीच दिला आहे.आज ते आनंदी आहेत याचा मला आनंद आहे.त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहिली तर मला वाटते मी कुठे कमी पडलो की काय ? परंतू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर मी काही तरी चुकलेलो नाही,असे मला नक्की वाटते आणि त्यांचे आशिर्वाद घेऊनच आगामी काळात काम करण्याची मनोमन इच्छा नेहमीच राहिलेली आहे.स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची ही कर्मभूमी राहिलेली आहे.त्यांची राजकीय सुरुवात याच मतदार संघातून झालेली आहे.माझी सुद्धा राजकीय सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून याच मतदार संघातून झाली आहे. याच मतदारांनी मला तेथे पाठविले आहे.हे मला विसरता येणार नाही.त्यामुळे भोकरला कुठं ही काही कमी पडू देणार नाही.’मी कुठेही असेन चिंता करु नका तुम्हाला काही कमी पडणार नाही,त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही!’ असे ही ते म्हणाले.
एकूणच पक्षांतरच्या चर्चेच्या वल्गणांना मतदार संघ अर्थातच कर्मभूमीत व्यक्त केलेल्या मनोगतातून ते पुर्णविराम देतील असे अपेक्षित होते.परंतू असे झाले नाही, तर त्यांचे वडील व त्यांना याच मतदार संघातील जनतेने भरभरुन प्रेम,आशिर्वाद देऊन उच्च पदावर पाठविल्याची आठवण त्यांनी करुन दिली.तसेच त्यांचे आशिर्वाद घेऊनच आगामी काळात काम करण्याची मनोमन इच्छा नेहमीच राहिलेली आहे,असे ही म्हटले आहे.यामुळे अप्रत्यक्षरीत्या या वक्तव्यातून आगामी काळात ते काही नुतन भुमिका घेण्यापूर्वीचे सुतोवाच तर करत नाहीत ना ? असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे.तसेच आमदारांच्या विकास निधीची मर्यादा पाहता व सत्तांतर झालेले असतांना आणि सद्या ते विरोधी पक्षात असतांना भोकरला कुठं ही काही कमी पडू देणार नाही.’मी कुठेही असेन चिंता करु नका तुम्हाला काही कमी पडणार नाही,त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही!’ असे ते का म्हणाले असावेत ? विद्यमान सरकार त्यांना असे झुकते माप देईल का ? यावरही प्रश्न चिन्ह उभे असतांना हा विश्वास त्यांनी नेमका कोणत्या बळावर दर्शविला आहे ? असे ही अनेकांतून बोलल्या जात असल्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वल्गनेचा सभ्रम संपण्या ऐवजी पक्ष कार्यकर्ते व जनतेत वाढता आणि जैसे थे राहिला आहे.
खरे पाहता पक्षांतरासंदर्भात ते कर्मभूमीत बोलतील असे अपेक्षित ठेवून त्या लोकार्पण सोहळ्यास गेलेल्या अनेकांचा अपेक्षा भंग झाला आहे.राजकीय क्षेत्रात केंव्हाही काहीही होऊ शकते, अशक्य काहीच नसते.माजी मुख्यमंत्री तथा आमदार अशोकराव चव्हाण हे एक विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहेत.त्यांचे पक्षांतर होईल अथवा होणार ही नाही ? हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे.परंतू नांदेड जिल्हा व भोकर विधानसभा मतदार संघाच्या विकासात असलेले त्यांचे योगदान पाहता ते पुनश्च सत्तेत येणे ही अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाहुयात पक्षांतराची चर्चा खरी ठरते का विरोधी बाकावर बसूनच ते भोकर मतदार संघाचा विकास साधतात…? आणि सामान्य जनतेच्या हाती अन्य आहे तरी काय…? जे जे होईल ते ते पाहत रहावे बस एवढच…!