‘मानली ना हार मी’ या कवितासंग्रहास कवयित्री शांता शेळके पुरस्कार
कवयित्री सुचिता दामोदर गायकवाड यांना सदरील पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
अंबुज प्रहार प्रतिनिधी
कणकवली : येथील कवयित्री सुचिता दामोदर गायकवाड यांच्या ‘मानली ना हार मी’ या कवितासंग्रहास सन २०२१-२२ या वर्षातील कवयित्री शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार झाला होता.सदरील पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले असून कवयित्री सुचिता गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते तो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सुगावा प्रकाशन,पुणे या नामांकित प्रकाशन संस्थेने ‘मानली ना हार मी’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची या कवितासंग्रहास प्रस्तावना आहे.तसेच सुप्रसिद्ध समीक्षक,विचारवंत,कवी यशवंत मनोहर यांची या कविता संग्रहाला पाठराखण लाभली आहे.मंचर जि. पुणे येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी राज्यातील महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवितासंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.मंचर येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे,सुप्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते सुचिता गायकवाड यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जिजाऊ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ॲड.सुनिल बांगर,शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायगुडे उपस्थित होते.
सुचिता गायकवाड यांच्या ‘साक्षीदार’ या पहिल्या कवितासंग्रहालाही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माता रमाई हे त्यांनी लिहिलेले चरित्रपर पुस्तक प्रकाशित असून ‘मानली ना हार मी’ या कवितासंग्रहातून त्यांनी स्त्रीवादी, ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक प्रश्न मांडले आहेत.तर प्रा.सुचिता गायकवाड यांना कवयित्री शांता शेळके पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव डी.एम. नलावडे,कार्याध्यक्ष डॉ.सूर्यकांत तायशेटे,उप कार्याध्यक्ष मोहन काणेकर,कै.सौ.इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्याम सोनुर्लेकर,एस.एम.हायस्कूल चे मुख्याध्यापक जी.एन. बोडके व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने देखील कवयित्री सुचिता गायकवाड यांचे अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन व पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!