Wed. Dec 18th, 2024

मयत कोतवालाच्या पत्नीस दिला आ.राजूरकर यांच्या हस्ते ५० लक्ष रुपयाचा सानुग्रह सहाय्य धनादेश

Spread the love

कर्तव्य बजावतांना भोकर तहसिल कार्यालयांतर्गत सेवारत कोतवाल लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड यांचा कर्तव्य बजावतांना कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाने झाला होता मृत्यू…

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर (प्रतिनिधी) : भोकर तहसिल कार्यालयांतर्गत साजा पाळज येथे आस्थापनेवर सेवारत असलेले कर्मचारी कोतवाल लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड यांचा कर्तव्य बजावतांना कोव्हिड-१९ विषाणूचा संसर्ग झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यामुळे शासनाने घोषित केल्याप्रमाणे विमा सुरक्षा कवच सानुग्रह सहाय्य निधीचे ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. सदरील सानुग्रह सहाय्य निधीचा ५० लक्ष रुपयांचा धनादेश विधान परिषदेचे प्रतोद तथा आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते दि.३० डिसेंबर रोजी मयत कोतवाल यांच्या पत्नीस प्रदान करण्यात आला. यावेळी नांदेड जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार राजेश लांडगे व आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखालील तहसिल कार्यालय भोकर जि.नांदेड अंतर्गत साजा पाळज येथे आस्थापनेवर सेवारत असलेले कर्मचारी कोतवाल लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड यांचा कोव्हिड-१९ च्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने प्रतिबंध करण्याचे कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-१९ (कोरोना)विषाणूचा संसर्ग होऊन उपचारा दरम्यान १४ दिवसांनी दि.२७ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला.कर्तव्य बजावतांना अशा प्रकारे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने वित्त विभाग,शासन निर्णय दि.२९ मे २०२० अन्वये ५० लक्ष रुपयाचे सानुग्रह सहाय्य विमा सुरक्षा कवच देण्याचे घोषित केले होते.त्याच अनुशंगाने जिल्हाधिकारी,नांदेड यांनी कै.लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड कोतवाल यांच्या कुटुंबियांना शासन निर्णय,वित्त विभाग क्र.संकीर्ण- २०२०/प्र.क्र.अध्यय-१ दि.२९ मे २०२० अनुसार ५०,००,०००/-रुपये (पन्नास लक्ष रुपये फक्त) इतक्या रक्कमेच्या सानुग्रह सहाय्य निधी मंजूरी करण्यात यावा असा प्रस्ताव शासनास सादर केला.

जिल्हाधिकारी नांदेड यांनी कै.लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड हे मृत्यूच्या दिनांकापुर्वी १४ दिवस अगोदर कर्तव्यावर होते असे प्रमाणित केले व मयत कोतवाल यांचा मृत्यु हा कोव्हिड-१९ या विषाणूशी संबंधित आहे.असे संबंधित सरकारी श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय, नांदेड यांनी दिलेल्या  अहवालास ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अधिपत्याखालील साजा पाळज ता.भोकर यांच्या आस्थापनेवर कार्यरत कर्मचारी कोतवाल कै.लक्ष्मण विठ्ठल शेपूरवाड यांच्या नामनिर्देशित व्यक्तिस(कुटूंबीय) कायदेशीर वारसास ५० लक्ष रुपये इतकी रक्कम सानुग्रह सहाय्य विमा सुरक्षा कवच निधी प्रदान करण्यास मंजूरी देण्यात आली.तसेच मा.विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे ती रक्कम वर्ग करण्यात आली होती.

सदरील मंजूर सानुग्रह सहाय्य निधीचा ५० लक्ष रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी तहसिल कार्यालय भोकर यांच्याकडे वर्ग केला होता.तो धनादेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान परिषदेचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते मयत कोतवाल कै.लक्ष्मण शेपूरवाड यांच्या पत्नी श्रीमती रुकमाबाई लक्ष्मण शेपूरवाड यांना नांदेड जि.प.च्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार राजेश लांडगे,जि.प.चे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य नागनाथ घिसेवाड,उप सभापती गणेश राठोड,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील, संचालक रामचंद्र मुसळे यांसह आदींच्या प्रमुख उपस्थितीत दि.३० डिसेंबर २०२१ रोजी उपविभागीय कार्यालय भोकरच्या बैठक कक्षात प्रदान करण्यात आला.भोकर तहसिलचे तत्कालीन तहसिलदार भरत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापण विभागाचे नायब तहसिलदार संजय सोलंकर व महसूल सहाय्यक साहेबराव अशोकराव भालेराव यांनी उपरोक्त सानुग्रह सहाय्य निधीसाठीचा अहवाल तयार करण्याचे कामकाज पाहिले होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !