भोकर येथे वकील महिलेच्या घरी झाली १ लाख ६२ हजाराच्या ऐवजाची चोरी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या शहीद प्रफुल्ल नगर भोकर परिसरात राहत असलेल्या वकील महिलेच्या घराच्या दाराचे कुलूप कडी तोडून घरातील कपाटातील व अन्य ठिकाणी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयाचा ऐवज चोरुन चोरट्यांनी पलायन केले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भोकर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड.वनिता रामराव राठोड(३७) रा.शहीद प्रफुल्ल नगर (चिखलवाडी) परिसर भोकर जि.नांदेड या दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेल्या असल्याचे पाहून दि.२४ ते दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप कडी तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाटातील व अन्य ठिकाणी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन पोबारा केला. अॅड.वनिता रामराव राठोड या दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता घरी आल्यानंतर त्याना झालेला चोरीचा प्रकार निदर्शनास आला.यामुळे त्यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व रितसर फिर्याद दिली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना(आय.पी.एस.)यांनी घटनास्थळी भेट दिली असून उपरोक्त वकील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोकर पोलीसात गुरनं.४०९/२०२२ कलम ४५४, ४५७,३८० भादवि प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.एस. एम.कांबळे हे करत आहेत.
बाहेरगावी जात असाल तर किमती ऐवज सुरक्षित ठेवावेत व खबरदारी घ्यावी-पो.नि.विकास पाटील
दिवाळी सण काळात व त्यापुर्वी भोकर पोलीसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील नागरिकांना आवाहन केले होते की,सणानिमित्त किंवा अन्य कामानिमित्त कोणी बाहेरगावी जात असतील तर त्यांनी घराशेजारील शेजा-यांना त्याबाबत माहिती द्यावी व घरातील किमती ऐवज आणि रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. परंतू या आवाहनाकडे काहीजण लक्ष देत नाहीत, त्यामुळेच आरोपी अशा निष्काळजीचा फायदा घेत असतात.तरी सर्व नागरिकांनी याबादची काळजी व खबरदारी घ्यावी,असे आवाहन भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील यांनी केले आहे.