Mon. Dec 23rd, 2024

भोकर येथे दोन दुचाकी धडकल्या;यात २ स्वारांचा झाला मृत्यू

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर -म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील भोकर शहरातील पाटबंधारे (जलसंपदा)विभाग कार्यालयासमोर दि.४ जुलै रोजी सायंकाळी दोन दुचाकी समोरासमोरुन एकमेकांना धडकल्या.या भिषण अपघातात एका दुचाकीवरील एका स्वाराचा जागिच मृत्यू झाला असून दुसऱ्या दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या स्वाराचा नांदेड येथे अधिक उपचारार्थ नेत असतांना मृत्यू झाला असल्याचे समजते.

कृष्णा भावजी ढवळे(२५)रा.मौ.चिंचाळा ता.भोकर हे सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान बुलेट दुचाकी क्र.एम.एच.२६ सी.सी.३५११ वरुन भोकर येथून गावी चिंचाळा येथे जात होते.यावेळी स्वतंत्र फायनान्स कंपनी मुंबई चे कर्मचारी सचिन होळकर (२४) रा. निवरवाडी ता.हदगाव हे कांडली ता.भोकर येथील वसूली करुन स्प्लेंडर दुचाकी क्र.एम.एच.२० डी.एन. ०७८० वरून भोकरकडे येत होते.या दोघांच्या भरधाव वेगातील दुचाकी भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील भोकर येथील पाटबंधारे (जलसंपदा) विभाग कार्यालया समोर येताच एकमेकांना समोरासमोरुन जोरात धडकल्या.या भिषण अपघातात कृष्णा ढवळे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.तर सचिन होळकर यांनी हेलमेट परिधान केलेले होते. त्यामुळे डोक्यास मार लागला नसला तरी शरिरावर अन्यत्र गंभीर मार लागला.

सदरील अपघाताची माहिती भोकर पोलीसांना मिळताच सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव यांसह आदीजणांचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. तसेच तेथे जमलेल्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी मयत कृष्णा ढवळे यांचे पार्थिव आणि जखमी सचिन होळकर यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणले.यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी कृष्णा ढवळे यांना मयत घोषित केले व जखमी सचिन होळकर यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील अधिक उपचारार्थ त्यांची नांदेड येथे रवानगी केली.परंतू सचिन होळकर हे देखील गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ते पोहचण्या अगोदर रस्त्यातच त्यांची ही प्राणज्योत मालवल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले.तर पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ व अपघाताचा पंचनामा आणि गुन्हा नोंद करण्याची पुढील प्रक्रिया भोकर पोलीसांकडून करणे सुरु आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !