भोकर येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत समावेशित शिक्षण विभाग व जिल्हा परिषद हायस्कूल भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ डिसेंबर २०२२ रोजी विविध उपक्रमांनी ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळ प्रहरी भव्य प्राभातफेरीचे आयोजन करून परिसरात दिव्यांगाप्रती जनजागृती करण्यात आली.जनजागृती रॅली नंतर दिव्यांगांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी एम.जी वाघमारे हे होते.तर महसूल विभाग प्रतिनिधी दिलीप कावळे,पंचायत समिती कार्यालय प्रतिनिधी अक्षय राठोड,जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश खोकले,प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण सुरकार,अनिल शिरसाठ यांसह आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.
मार्गदर्शनपर मनोगतात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांगांना राज्यघटनेने दिलेले अधिकार व हक्क याविषयी मार्गदर्शन केले.तसेच प्रत्येक नागरिकांनी दिव्यांगाना दया न दाखवता मदतीचा हात पुढे केल्यास त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यास उशीर होणार नाही. समाजात असलेली गैरबराबरीची भावना दुर होऊन समतेची वागणूक मिळेल,अशा भावना ही त्यांनी मनोगतातून बोलताना व्यक्त केल्या.तर शाळा स्तरावर शिक्षक व सामान्य विद्यार्थी बांधवांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक न देता त्यांच्याप्रती मैत्रभाव निर्माण केल्यास त्यांना आपोआपच समान संधी प्राप्त होतील व समता निर्माण होण्यास मदत होईल.त्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा,असे आवाहन गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे यांनी करून तालुक्यात समावेशित शिक्षण विभागाकडून चांगले काम होत असल्याचे गौरवोउद्गार करून विशेष शिक्षकांचा सन्मान केला.
कार्यक्रमात परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा, नागरिकांचा समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.शिक्षक डेव्हिड ग्राहमबल यांनी केले.संतोषी पांतुलवार यांनी ‘दिव्यांगांसाठी’ असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
सदरील कार्यक्रमांचे सुरेख असे सूत्रसंचलन सुधांशु कांबळे यांनी केले.तर आभार सहशिक्षक नितीन कासार यांनी मानले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक तथा परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल येथील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.