भोकर येथे उद्या शिक्षण सहसंचालक डॉ.डी.एस. मठपती यांचा सन्मान सोहळा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी डॉ.डी.एस.मठपती यांची लातूर येथे उपसंचालक कार्यालयात शिक्षण सहसंचालक म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती झाल्यामुळे गट शिक्षणाधिकारी कार्यालय,भोकरच्या वतीने उद्या दि.११मार्च २०२२ रोजी त्यांचा कार्य गौरव व कर्तव्यपुर्ती सन्मान समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.दत्तात्रय मठपती हे दि.१८ जानेवारी २०२० रोजी भोकर तालुका शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते.ते अल्पशा काळात तालुक्यात अनेक वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांनी आग्रही पर्यायाने कठोर भूमिका बजावली होती.त्यामुळेच तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला होता. नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी सरस ठरले आहेत.त्यांच्या प्रयत्नांतून अनेक शाळांना संजीवनी मिळाली आहे.उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर शबासकीमची थाप त्यांनी दिल्याने ही थाप प्रत्येक शिक्षकांना प्रेरणादायी ठरली आहे.चांगल्या कामाचे ते सतत कौतुक करत,म्हणूनच भोकर तालुका हा जिल्हायातील शिक्षण क्षेत्रात अल्प कालावधीत नावारूपाला आला असल्याचे दिसते.
डॉ.दत्तात्रय मठपती यांची झालेली पदोन्नती ही सर्वव्यापी व आनंदायी ठरली असली तरी भोकर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र एका कप्प्यात वेदनादायी झाली आहे.एक कर्तव्यकठोर,शिस्तप्रिय, संवेदनशील मनाचा माणूस म्हणून डॉ.दत्तात्रय मठपती यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली होती.असे कर्मयोगी अधिकारी तालुका सोडून जाताना मात्र भोकर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह आदींच्या मनाला हुरहूर लावून जाणारीच बाब आहे.
त्यामुळे उद्या दि.११ मार्च २०२२ रोजी तालुक्यातील शिक्षक, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी व शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यासाठी कर्तव्यपुर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालय,भोकरच्या सभागृहात सकाळी ठिक ११:०० वाजता करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे यांसह भोकर पं.स. शिक्षण विभागाने केले आहे.