भोकर येथील बिंदू महाविद्यालयाचे सचिव मांजरमकर यांच्या घरी धाडसी चोरी
रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरटे झाले पसार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील दिगंबरराव बिंदू स्मारक समिती तथा महाविद्यालयाचे सचिव शेख मुराद मियां मांजरमकर यांच्या सईद नगर येथील मुलाच्या नुतन घरी कोणी नसल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम १ लाख ५० हजार रुपये व १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी भोकर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध धाडसी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर येथील प्रतिष्ठित नागरिक दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे सचिव शेख मुराद मियां मांजरमकर यांच्या सईद नगर,देशमुख कॉलनी भोकर येथील नुतन घरी त्यांचा मुलगा शेख बशीर शेख मुराद मियां मांजरमकर व त्यांचा परिवार राहतो.त्यांचा मुलगा शेख बशीर मांजरमकर व त्यांची पत्नी हे दि.१६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता सईद नगर भोकर येथून त्यांच्या भावाच्या आजारी मुलीस पाहण्यासाठी सहकुटूंब नांदेड केयर हॉस्पिटल येथे गेले होते.उपचार सुरु असलेल्या त्या मुलीस पाहून हे कुटूंब रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान भोकर येथे परत आले. यावेळी ते सईदनगर येथील घरी न जाता इनामदार गल्ली भोकर येथील जुन्या घरी गेले.तसेच त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केला व दि.१७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजताच्या दरम्यान शेख बशीर मांजरमकर यांच्या पत्नी या सईदनगर येथील नुतन घरी गेल्या असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडून कोणीतरी घरात गेल्याचे निदर्शनास आले.हे पाहून त्यांनी आरडा ओरड केली.यावेळी काय झाले ? हे पाहण्यासाठी काही शेजारी धावून आले.त्या सर्वांना चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी त्या महिलेस घरात जावू नका,असे सांगितले,परंतू त्या महिलेने घरात प्रवेश केला व पाहिले,तर त्यांना घरातील कपाट उघडे दिसले व कपाटील आणि घरातील सामान आस्ता व्यस्त पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी शेख बशीर मांजरमकर यांच्या भावास फोन करुन सईदनगर येथील त्यांचे घर कोणीतरी फोडले असल्याची माहिती दिली.यावेळी शेख बशीर मांजरमकर यांच्या भावाने भोकर पोलीस ठाणे गाठले व याबाबतची माहिती पोलीसांना दिली. यावरुन भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव ए.धरणे, पो.नि.विकास पाटील व पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली.तसेच तपास कामी दिशेने योग्य अशा सुचना केल्या.
दि.१६ जानेवारी रोजी दुपारी २:०० ते १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजताच्या दरम्यान त्या घरातील कपाटातील सोन्याचे गलसर,सोन्याचे चैन,सोन्याचे नेकलेस,सोन्याचे कानातील दोन रिंग,सोन्याच्या ३ अंगठ्या,सोन्याचे गंठन व मनी,असा १ लाख ६० हजार रूपये किमतीचा ऐवज आणि रोख १ लाख ५० हजार रुपये असा एकूण ३ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार झाल्याची रितसर फिर्याद शेख बशीर शेख मुराद मियां मांजरमकर यांनी भोकर पोलीसात दिली.यावरुन भोकर पोलीसात गुरनं २३/२०२३ कलम ४५४,४५७,३८० भादंवि प्रमाणे आज्ञात चोरट्याविरुद्ध धाडसी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.अनिल कांबळे हे करत आहेत.