भोकर मध्ये होऊ घातलेला अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला
भोकर पोलीस व एकात्मिक बाल विकासच्या कर्मचारी भगिणींनी बजावली कर्तव्यतत्परता
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : येथील गणराज रिसोर्ट मंगल कार्यालयात दि.१२ जून रोजी हदगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा औंढा तालुक्यातील एका मुलांसोबत मोठ्या थाटामाटात विवाह होऊ घातला होता.परंतू एका गोपनीय माहितगाराने ११२ वर कॉल करुन भोकर पोलीसांना माहिती दिली की उपरोक्त ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह होत आहे. यावरुन पोलीस यंत्रणा तात्काळ उपरोक्त मंगल कार्यालयात पोहचली व त्यांनी याबाबतची माहिती तहसिलदार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्यावरुन महिला कर्मचारी भगिणींनी घटनास्थळी धाव घेतली व मुलींच्या वयाची शहानिशा केली असता ती अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने होऊ घातलेला विवाह थांबला आणि दोन्हीकडचे कुटूंबीय,नातेवाईक,निमंत्रितांना नियोजित नव वधू-वरावर अक्षता न टाकताच माघारी परतावे लागले.
हदगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील एका मुलांसोबत विवाह निश्चित करण्यात आला होता.दोन्ही कुटूंबियांनी ठरविल्या प्रमाणे भोकर येथील गणराज रिसोर्ट मंगल कार्यालयात दि.१२ जून २०२३ रोजी सकाळी विवाह मुहूर्त काढण्यात आला.मुला-मुलीकडील (नियोजित वधू-वर) सर्व पाहुणे,निमंत्रित स्नेहिजण लग्नमंडपात जमले.परंतू विवाह संपन्न होण्याच्या अवघ्या काही वेळेपुर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी,जमादार नामदेव जाधव,पो.कॉ.चंद्रकांत आरकीलवार,वाहन चालक जमादार राजेश दुथाडे यांसह भोकर पोलीसांचा ताफा विवाह मंडपी पोहचला व होऊ घातलेला विवाह थोडावेळ थांबवा म्हणून वधू-वराच्या पालकांना त्यांनी सुचना केली.त्यामुळे उपस्थितांत एकच खळबळ उडाली.
झाले असे की,भोकर पोलीसांच्या आपत्कालीन तत्परसेवा वाहनावरील ११२ वर एका माहितगाराने संपर्क साधला व गोपनीय माहिती दिली की,गणराज रिसोर्ट मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे तो थांबवा.या माहितीवरुन पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला आणि तो विवाह थांबवून त्यांनी याबाबतची माहिती भोकरचे तहसिलदार,एकात्मिक बाल विकास प्रकल्प भोकरचे अधिकारी,समाज कल्याण अधिकारी यांसह आदींना दिली.ही माहिती मिळताच एकात्मिक बाल विकास प्रकल्प च्या पर्यवेक्षिका अर्चना शेट्टे,सुषमा सिसोदे,अरुणा इनामदार,तक्षशिला हिरे- गायकवाड,वंदना आमने,वाघमारे,लोकडे यांसह आदीजण विवाह मंडपी पोहचले व त्यांनी नियोजित वधू-वरांच्या वयाच्या दाखल्यांची तपासणी केली असता त्या वधूचे वय केवळ १६ वर्ष १० महिने असल्याचे निदर्शनास आले.यावरुन नियोजित वधू ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने होऊ घातलेला विवाह थांबविण्याची सूचना देण्यात आली.यावेळी उपस्थित पाहुणे, निमंत्रित स्नेहिजण हे उपाशी पोटी कोणीही जाऊ नयेत म्हणून पोलीस व महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सर्व उपस्थितांनी भोजन करुनच जावे अशी विनंती केली.परंतू विवाह सोहळ्यासाठी आलेल्या त्या सर्वांची यामुळे एकच तारांबळ उडाली व सर्वांच्या आनंदोत्सवात पाणी फेरल्या गेल्याने अनेकांनी भोजन न करताच तेथून जाणे उचित मानले.यानतर बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा-२००६ ची माहिती व समज मुला-मुलींच्या आईवडिलांना देण्यात आली व त्या मुला-मुलीचे वय कायदेशीर विवाहयोग्य होणार नाही तोपर्यंत त्यांचा विवाह करणार नाही असे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले.भोकर मध्ये होऊ घातलेला अल्पवयीन मुलीचा विवाह कर्तव्यतत्पर अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांनी थांबविला आणि दोन्हीकडील व-हाडी मंडळी त्या मुला-मुलीस घेऊन आपापल्या घरी माघारी परतले.तर लिहून घेण्यात आलेल्या हमीपत्राचे तंतोतंतपणे पुढील काळात पालन होईल काय ? यावर प्रश्नचिन्ह असून त्यावर लक्ष ठेवण्याची पुढील जबाबदारी आता हदगाव तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर आहे.
मंगल कार्यालय मालकास ही बजावण्यात आली नोटीस
१९२९ च्या कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुली आणि १८ वर्षांखालील मुलांचा विवाह करण्यास बंदी होती.या कायद्यात १९७८ मध्ये सुधारणा करून महिलांसाठी किमान वय १८ वर्षे आणि पुरुषांसाठी २१ वर्षे करण्यात आले.सदरील कायदा तरतुदीनुसार अशा प्रकारे कमी वय असलेल्या मुला-मुलींचा विवाह करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले असून या कायदाचे उल्लंघन करणे हा दखलपात्र,दंडात्मक व शिक्षापात्र गुन्हा आहे. याविषयी अनेक प्रकारे प्रबोधन व जनजागृती शासन करते.परंतू अधून मधून अशा प्रकारे ‘बालविवाह’ होतच असतात.हे झालेल्या घटनेवरुन दिसते.म्हणूनच बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अल्पवयीन मुला-मुलीचे लग्न लावले तर नातेवाईक,मंडप डेकोरेशनवाला,मंगल कार्यालय मालक,आचारी,पंडितजी यांसह आदी संबंधितांवर कार्यवाही होऊ शकते.याच अनुषंगाने मंगल कार्यालय मालकांनी विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने देतांना नियोजित वधू-वरांच्या वयाची खात्री करुन घ्यावी व नंतरच मंगल कार्यालय भाड्याने द्यावे हा नियम आहे.तसे न केल्यास भादंविच्या कलम ३४ नुसार ते सहआरोपी होऊ शकतात.भविष्यात हे होऊ नये म्हणून भोकर येथील सदरील मंगल कार्यालय मालकास ही समज नोटीस बजावण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे.