भोकर नगर परिषद ‘फास्ट मुव्हींग सिटी इन २५-५० के’ पुरस्काराने सन्मानित
महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर नगर परिषदेचे प्रशासक राजेश लांडगे,मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व कर्मचा-यांनी दिल्ली येथे स्विकारला हा सन्मानाचा पुरस्कार
उत्तम बाबळे,संपादक
दिल्ली : केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरी वसाहतीमध्ये स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत जावे यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते.त्यात भोकर नगर परिषदेची सन २०२१-२२ च्या ‘फास्ट मुव्हींग सिटी इन २५-५० के’ पुरस्कारासाठी निवड झाली होती.सदरील पुरस्कार वितरणाचा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला असून महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे भोकर नगर परिषदेच्या अधिका-यांना उपरोक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

स्वच्छतेचे महत्व लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१६-१७ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.या अभियानांतर्गत देशातील महानगरपालिका,नगरपालिका,नगर परिषदा, नगरपंचायती यांनी वर्षभर राबविलेल्या स्वच्छता अभियानावर आधारित ठरवून दिलेल्या काही निकषांनुसार प्राप्त गुणांकनातून त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्याच निकषांच्या अनुशंगाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१-२२ करीता देशातील पश्चिम क्षेत्रातून करण्यात आलेल्या परीक्षणात भोकर नगर परिषदेची २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या शहरातून मागील वर्षाच्या स्वच्छता कामाच्या तुलनेत यावर्षीच्या कामगिरीने खुप भरारी घेतल्याच्या श्रेणीत राज्यातून ७ व्या व मराठवाड्यातून प्रथम क्रमांकाच्या ‘फास्ट मुव्हींग सिटी इन २५-५० के’ पुरस्कारासाठी निवड झाली होती.त्याच अनुशंगाने दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ताल कोटरा स्टेडियम,नवी दिल्ली येथे अनेक केंद्रीय मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या भव्य दिव्य सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय गृहनिर्माण,शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण राज्य मंत्री व शहर विकास मंत्री कौशल किशोर आणि केंद्रीय सचिव यांच्या हस्ते प्र.भोकर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तथा भोकर नगर परिषदेचे प्रशासक राजेश लांडगे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग इंजि. माधव जमदाडे,शहर समवन्वयक किशोर राठोड यांना ‘फास्ट मुव्हींग सिटी इन २५-५० के’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कार मिळाल्याने माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण,मुंबई मंत्राल्यातील अवर सचिव राजेंद्र खंदारे,सर्व माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांसह अनेकांतून उपरोक्तांचे अभिनंदन होत आहे.

सदरील पुरस्कार मिळाल्याने उपरोक्त सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी संपर्क साधला असता मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी म्हटले आहे की, या सन्मानाच्या पुरस्काराचे हक्कदार हे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शहरातील सर्व नागरिक व यासाठी सहकार्य करणारे आणि दिवसरात्र परिश्रम घेणारे स्वच्छता कर्मी आहेत.मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करते व अभिनंदन ही करते. तसेच भोकर शहराच्या विकासासह स्वच्छतेसाठी पुढील काळात जे जे प्रयत्न व परिश्रम करता येतील ते आम्ही करु आणि शहर स्वच्छ,सुंदर करु.याच बरोबर पुढील काळात भोकर नगर परिषदेस राज्यातून प्रथम पुरस्कार मिळावा यासाठी परिश्रम घेऊ,असेही त्या म्हणाल्या.

उपरोक्त पुरस्कार मिळाल्या बद्दल भोकर नगर परिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी व शहरातील नागरिकांचे मनापासून हार्दिक अभीनंदन आणि भावी यशासाठी शुभेच्छा !
उत्तम बाबळे,संपादक