भोकर तालुक्यातील २६ टक्के शेतक-यांना वाटप झाली अनुदान रक्कम
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियोजनबद्ध वाटपामुळे अतिवृष्टीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे समाधान ; तर यासाठी परिश्रम घेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विभागीय अधिकारी श्यामसुंदर कदम पाटील यांनी केले अभिनंदन!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा भोकर ने दिलेल्या एकूण उद्दिष्टापैकी २६ टक्के लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले असून नियोजनबद्ध वाटपामुळे अतिवृष्टीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.तर नियोजनबद्धतेने अल्पावधीत हे करणे शक्य झाल्यामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी विभागीय अधिकारी शामसुंदर कदम पाटील,शाखा अधिकारी अरविंद चौधरी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा भोकर कार्यक्षेत्रातील तालुक्यातील ७९ गावांतील ३७ हजार ६९५ अतिवृष्टीग्रस्त लाभार्थी शेतक-यांसाठी २७ कोटी ४९ लाख ९० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते.हे अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर,मुदखेड, अर्धापूर विभागाचे विभागीय अधिकारी शामसुंदर कदम पाटील यांनी सर्व शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक विशिष्ट असे नियोजन आखले आणि लाभार्थी खातेदारांच्या खात्यावर थेट अनुदान रक्कम जमा केली.तसेच बहुतांश लाभार्थी खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप केले.यामुळे तालुक्यातील ६ हजार लाभार्थी शेतक-यांनी अनुदानाची रक्कम एटीएम द्वारे परस्पर उचल केली आहे.उर्वरीत लाभार्थी शेतक-यांना गाव निहाय क्रमवारीने दि.६ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष अनुदान रक्कम वाटपास सुरुवात करण्यात आली.अवघ्या २० दिवसात भोकर व किनी शाखेने १६ गावातील ९ हजार शेतक-यांना ७ कोटी १३ लक्ष ६४ हजार रुपयाचे रोख वाटप केले आहे.यात एटीएम धारक व प्रत्यक्ष उचल केलेल्या शेतक-यांची संख्या १५ हजार ६८७ आहे.तर वाटप झालेल्या लाभार्थी शेतक-यांची संख्या ४३ 43 टक्के असून यात रोख वाटप केलेली एकूण रक्कम २६ टक्के आहे.
या कामी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे भोकर,मुदखेड,अर्धापूर,विभागाचे विभागीय अधिकारी शामसुंदर कदम पाटील यांनी योग्य नियोजन करून अनुदान वाटपास सुरुवात केली.या कामात भोकर शाखेचे शाखाधिकारी अरविंद चौधरी,तपासणी अधिकारी रमेशराव सोळंके,रोखपाल गंगाहर उमरे, प्रकाश कुंचलवार,गोविंद नरवाडे,ए.एम.पटेल,किनी शाखेचे शाखाधिकारी सुभाषराव भोसले, रोखपाल कांगटे,एम.पी.जाधव यासह आदींनी परीश्रम घेतले आहेत व घेत आहेत.
नियोजनबद्धतेने अनुदान रक्कम वाटप होत असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी झाला असून या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.त्यामुळे नांदेड विभागाचे विभागीय अधिकारी श्यामसुंदर कदम पाटील यांनी लाभार्थ्यांना अनुदान वाटप लवकरात लवकर करता यावे यासाठी परिश्रम घेत असलेल्या सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.