भोकर तालुक्यातील १३३ प्रार्थनास्थळांनी घेतली भोंगे परवानगी
३ महिन्याकरिता असणार आहे परवान्याची वैधता;तर अटी व शर्तीचा भंग केल्यास भविष्यात ध्वनिक्षेपक यंत्र वापराची परवानगी होऊ शकते रद्द
अफवांवर विश्वास न ठेवता कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करावे- पो.नि.विकास पाटील
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा, शांतता व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या आदेशाची आमलबजावणी करुन सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांनी भोंगे-ध्वनीक्षेपन यंत्र वापरण्यासाठीची परवानगी पोलीसांकडून घ्यावी असे आवाहन करण्यात आल्यावरुन भोकर तालुक्यातील १३३ प्रार्थनास्थळांनी भोंगा-ध्वनीक्षेपन यंत्र वापराच्या परवानगी साठी रितसर अर्ज दाखल केले असून यातील बहुतांश जणांना परवाने देण्यात आली आहेत.तसेच ३ महिन्याकरिता सदरच्या परवान्याची वैधता राहणार असून परवान्यातील घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्यास भविष्यात ध्वनिक्षेपक वापराची परवानगी रद्द होऊ शकते असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस ठाणे भोकरच्या कार्यक्षेत्रातील मस्जिद,मंदिर, गुरुद्वारा,चर्च,बौद्ध विहार व इतर धार्मिक स्थळे यावरील भोगे-ध्वनिक्षेपन यंत्र लावण्यासाठी रितसर लेखी अर्ज दि.३० एप्रिल २०२२ पर्यंत करावेत व लेखी मंजूरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच भोगे-ध्वनिक्षेपन यंत्राचा वापर करावा, असे आवाहन भोकर पोलीसांनी केले होते.तसेच याच अनुशंगाने दि.२५ एप्रिल २०२२ रोजी भोकर पोलीस ठाणे येथे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांचे जबाबदार, शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील व पत्रकार बांधव यांची एक महत्वपुर्ण बैठक घेतली.या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी उपस्थित व सर्व संबधीतांनी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी करावी आणि कायदा,शांतता,सुव्यवस्था ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.तर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी प्रार्थना स्थळांच्या सर्व संबंधीतांनी आपले किंवा आपले सहकारी यांच्याकडून नियमाचे तंतोतंत पालन करावे व लावण्यात आलेले भोंगे-ध्वनिक्षेपन यंत्र वापरासाठी परवानगी घ्यावी.तसेच परवानगीसाठी संबंधीतांनी कागदपत्रांसह दि.३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन केले.याच बरोबर मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय व घालून दिलेल्या अटींबाबद वाचन ही केले होते.

यानंतर भोकर शहर,तालुका व पोलीस ठाणे कार्रक्षेत्रातील मंदिर,मस्जिद,बौद्ध विहार अशा एकूण १३३ प्रार्थनास्थळांच्या विश्वस्त व जबाबदार संबधीतांनी भोंगा-ध्वनीक्षेपन यंत्र वापरासाठी परवानगीस्तव भोकर पोलीसांकडे रितसर अर्ज केले.यात ९५ मंदीर,२६ मस्जिद व १२ बौद्ध विहारांचा समावेश आहे.तर उपरोक्त बहुतांश प्रार्थना स्थळांना भोंगा-ध्वनीक्षेपन यंत्र वापरासाठीचा परवाना भोकर पोलीसांनी दिला असून त्या परवान्यात काही नियम व अटी घालून दिल्या आहेत.त्यातील महत्वाच्या काही अटी पुढीलप्रमाणे आहेत….
१)मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास अधिन राहून पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अन्वये सकाळी ६:०० वाजता ते रात्री १०:०० वाजतापर्यंत आवाजाची पातळी खाली नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू नये.औद्योगिक क्षेत्र-७५ डी.बी.(अ) एलईक्यू,व्यापारी क्षेत्र-६५ डी.बी.(अ)एलईक्यू, निवासी क्षेत्र-५५ डी.बी.(अ) एलईक्यू,शांतता क्षेत्र-५० डी.बी.(अ)एलईक्यू.२)ध्वनिक्षेपक वापरास रात्री १०:०० वाजता ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रतिबंध राहील.३) ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतूदी व मा.न्यायालयाने व शासनाने त्या अनुषंगाने निर्गमीत केलेले आदेश यांचे तंतोतंत पालन करावे.४)ध्वनिक्षेपक वापरामुळे कोणत्याही प्रचलित कायदयाचा भंग होणार नाही.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.५)अर्जामध्ये नमूद केलेल्या ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही धर्माच्या प्रार्थना स्थळासमोर करताना धार्मिक भावना दुखविल्या जातील अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा,नारे देवू नये. अगर आक्षेपार्ह गाणे वाजवू नये.६)अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनिक्षेपकाची जागा पोलीसांच्या पूर्व परवानगी शिवाय बदला येणार नाही.७) ध्वनिक्षेपक परवानगी असली तरी ही तक्रार प्राप्त होताच जर नियमाचे व कायदयाचे उल्लंघन झाल्यास ध्वनिक्षेपकाचा परवाना रद्द करण्याचा अधिकार पोलीसांना राहील आणि कायदेशीर कार्यवाही केली जाईल.८)इतर विभागाशी संबंधित असणारे आवश्यक परवाने मिळविण्याची जबाबदारी संबंधीतांची राहील.९)सदरचा परवाना हा केवळ ध्वनिक्षेपक यंत्र वापरा करिताच आहे. याचा उपयोग अन्य कोणत्याही बाबी साठी करता येणार नाही.ध्वनिक्षेपक वापराबाबत कोणत्याही उक्तसक्षम प्राधिकरणाकडून पोलीस ठाणे हद्यीत आदेश लागू केला असल्यास त्या आदेशातील तरतूदी बंधनकारक राहतील.
११)यातील अटी व शर्तीचा भंग केल्यास भविष्यात ध्वनिक्षेपक वापराची परवानगी मिळणार नाही.१२)सदरचा परवाना हा परवाना दिलेल्या दिनांकापासून ०३ महिन्याकरिताच वैध राहील व त्यानंतर त्याचे नुतनीकरण करावे लागेल.
अफवांवर विश्वास न ठेवता कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करावे- पो.नि.विकास पाटील

क्रातिसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती,रमजान ईद,अक्षय तृतीया व भगवान परशूराम जयंती निमित्त पो.नि. विकास पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.राज्यातील सद्य परिस्थिती पाहता कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, समाज माध्यमांवरुन अफवा पसरवू नयेत व कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.याच बरोबर मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय व घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्याची जबाबदारी ही सर्व धर्मीयांची असून कोणीही कायदा हातात घेऊ नये.तसेच भोंगे-ध्वनीक्षेपन यंत्र वापरासाठी दिलेल्या परवानगीतील नियम व अटींचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यात येईल,संबंधीतांना रोख रक्कमेचा दंड व १ ते ३ वर्षाची शिक्षेची ही तरतुद करण्यात आली आहे.असे त्यांनी म्हटले आहे.
क्रातिसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती, रमजान ईद,अक्षय तृतीया व भगवान परशूराम जयंती निमित्त…सर्वांना मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा! 🌺🌹👍🙏👍🌹🌺
उत्तम बाबळे,संपादक