भोकर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त ४५ हजार ४६० शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
५२ कोटी ४३ लाख रुपये नुकसान भरपाई अनुदान झाले प्राप्त – उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सन २०२२ च्या खरीप हंगामात भोकर तालुक्यातील ३८ हजार ५५२ हेक्टर शेती व पिके अतिवृष्टीमुळे जलमय झाली.अतिवृष्टीमुळे पिकांचे व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचा फटका ४५ हजार ४६० शेतकऱ्यांना बसला.या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई अनुदान म्हणून ५२ कोटी ४३ लाख रुपये मंजूर केले असून ती रक्कम प्राप्त झाली असल्याने त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे,अशी माहिती प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी दिली असून प्रधानमंत्री किसान योजनेसाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी तात्काळ करून घ्यावी,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
सन २०२२ च्या चालू खरीप हंगामात भोकर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिण्यामध्ये संततधार अतिवृष्टी चा पाऊस झाल्याने सर्वत्र नदी नाले दुथडी वाहिले आणि अनेक हेक्टर शेती जलमय झाली.यात खरीप पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतातील कापूस,सोयाबीन,ज्वारी,उडीद,मूग आदी कोवळी पिके नष्ट झाली.या आस्मानी संकटाने शेतक-यांना खुप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.पिके कोवळी असतांनाच अतिवृष्टीच्या पावसाने ऑगस्ट महिण्यातच वार्षिक सरासरी ओलाडली.त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्वरीत अनुदान मंजूर करावे अशी मागणी केली होती.
या मागणीच्या अनुशंगाने महसूल विभागाने अतिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे व सर्वेक्षण केले असता भोकर तालुक्यातील ३८ हजार ५५२ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.त्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची संख्या ४५ हजार ४६० असल्याचा अहवाल भोकर महसूल विभागाने वरीष्ठांना व शासनास पाठविला होता.त्या अहवालास शासनाने मंजूरी दिली असून अतिवृष्टी बाधित जमिनीच्या व पिकांच्या नुकसान भरपाईपोटी भोकर तालुक्यातील या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५२ कोटी ४३ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.ती रक्कम नुकतीच प्राप्त झाली असल्याची माहिती भोकरचे प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान दिली आहे.ती रक्कम लवकरच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून येत्या काही दिवसात खात्यावर जमा झालेली ती अनुदान रक्कम बँक वितरीत करेल,असे ही ते म्हणाले.याच बरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी केंद्राचा ६ हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.आता राज्याचे देखील ६ हजार रुपये मिळणार आहेत. असे राज्य सरकारने घोषित केले असल्यामुळे आगामी काळात या अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून त्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या लाभासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करुन घ्यावी,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.