भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारेंची सेवाभावी कर्तव्य तत्परता!
गुडघाभर चिखलमय रस्ता तुडवित जाऊन रिठ्ठा तांडा येथील रुग्णांना पुरविली उपचारसेवा
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : विकासाचा कितीही डिंडोरा पिटला तरीही आजही ग्रामीण भागातील कित्येक वाडी तांडे विकासापासून कोसोदुर आहेत.याचा प्रत्यय भोकर तालुक्यातील रिठ्ठा तांड्यावरुन आला आहे.भोकर शहरापासून अगदी ४ कि.मी.अंतरावर असलेल्या रिठ्ठा तांड्यास जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.अशातच सतंतधार पावसामुळे हा कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन या तांड्यास जाने अशक्य झाले आहे.याच दरम्यान तांड्यातील काही नागरिक आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी भोकर येथे आणायचे कसे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाद येथील काही नागरिकांनी दि.२६ जुलै रोजी कर्तव्यदक्ष भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना संपर्क साधून काही नागरिक आजारी असल्याची माहिती दिली.त्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,परिचारक,औषधी व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन गुडघाभर चिखल तुडवित रिठ्ठा तांड्यास जाऊन आजारी नागरिकांना उपचारसेवा देऊन सेवाभावी कर्तव्य तत्परता दाखविली.रुग्णांना तात्पुरती उपचार सेवा मिळाली.परंतु खरी विकास गंगा अशा वाडी तांड्यांपर्यत कधी पोहचणार व नागरी सुविधा कधी मिळणार ? यावर प्रश्नचिन्ह अद्यापही उभे आहे.
सविस्तर असे की,१० ते १५ घरे असलेला रिठ्ठा तांडा भोकर शहरापासून अवघ्या ४ कि.मी.अंतरावर असून भोकर-मुदखेड या मुख्य रस्त्यापासून एक ते दीड कि.मी.अंतरावर आहे.पक्क्या रस्त्यांची विकास गंगा सर्वत्र पोहचली आहे असा डिंडोरा पिटला जातोय.परंतु या तांड्यास जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता झालेल नाही.त्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखल तुडवित मुख्यरस्त्यावर येण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.अशातच संततधार पाऊस पडत असल्याने तो रस्ता चिखलमय झाला आहे.याच दरम्यान तांड्यातील काही वयस्कर नागरिक आजारी पडली असल्याने त्यांना उपचारासाठी न्यायचे कसे ? हा गंभीर प्रश्न त्या आजारी नागरिकांच्या नातेवाईकांसमोर निर्माण झाला होता.म्हणून त्या नागरिकांनी दि.२६ जुलै २०२२ रोजी दुपारी भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसिलदार राजेश लांडगे यांना भ्रमणध्वणीवरुन थेट संपर्क साधला आणि उपचार सेवा मिळावी अशी विनंती केली.
ही माहिती मिळताच कसलाही विलंब न करता उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निलावार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी डॉ.निलावार यांनी आपल्या सोबत एक परिचारक व काही औषधी घेऊन भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले.डॉक्टर येताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी डॉ. निलावार, परिचारक,औषधी व तहसिलदार राजेश लांडगे, मंडळ अधिकारी शेख मुसा भाई,तलाठी संजय खेडकर व एक कोतवाल यांचा ताफा सोबत घेऊन पाऊस सुरु असतांना देखील गुडघाभर चिखलमय असलेला तो पाऊल रस्ता तुडवित जाऊन त्यांनी रिठ्ठा तांडा गाठले.यावेळी तेथील जवळपास १० ते १२ आजारी नागरिकांची डॉ. निलावार यांनी तपासणी केली व सोबत आणलेली काही औषधी ही त्यांना दिली.
उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या सेवाभावी कर्तव्य तत्परतेमुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.माघिल वर्षी वाघू नदीच्या पुरात स्वतः उतरुन जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या दोन तरुणांना जीवनदान देण्याचे कर्तव्य उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी बजावले होते.तर या दिवसी रस्त्या अभावी उपचार न मिळालेल्या रुग्णांना उपचार सेवा पुरविण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले आहे,ही बाब कौतुकास्पद नक्कीच आहे.पक्क्या रस्त्या अभावी भविष्यात अशा गावांत काही अनर्थ ही होऊ शकतो,म्हणून रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटने गरजेचे आहे,असे तेथील नागरिकांनी यावेळी त्यांना सांगितले आहे.
या तांड्याच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसिलदार राजेश लांडगे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुचना दिल्या असल्याचे समजते.माघिल वर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर फुल नसल्यामुळे नांदा खु.ता.भोकर या गावचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटला होता व एका मयताचा मृत्तदेह बैलगाडीतून जवळपा १० कि.मी.अंतराचा चिखलमय रस्ता तुडवित न्यावा लागला होता.तर आता भोकर शहरापासून अवघ्या ४ कि.मी.अंतरावर असलेल्या रिठ्ठा तांडा या गावास उपचार आरोग्य सेवा अशा प्रकारे न्यावी लागली आहे.तसे पाहता भोकर विधानसभा मतदार संघ हा राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांचा असल्याने भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास गंगा वाहत असल्याचे बोलल्या जाते.परंतु अद्यापही असे अनेक गावे ‘त्या’ विकास गंगेपासून वंचित आहेत.त्यामुळे आमदार अशोक चव्हाण यांनी अशा गावांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून ‘ती’ विकास गंगा या गावांकडे कधी वाहणार ? याची प्रतिक्षा तेथील नागरिक करत आहेत.