भोकर अपर पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक पो.ना. समंदरे यांचा मुंबईत रेल्वे अपघात मृत्यू
उद्या सकाळी हिंदू दहनभूमी गोवर्धघाट नांदेड येथे त्यांच्यावर पोलीस इतमामात होणार अंत्यसंस्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाणे अंतर्गत सेवारत असलेले भोकर अपर पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले पो.ना.शिवराम श्रीपतराव समंदरे हे बहिणीस मुंबई येथे सोडण्यासाठी गेले असता दि.१९ डिसेंबर रोजी मुंबईतील एका रेल्वेस्थानकावर लोकल ट्रेनच्या अपघात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने नांदेड जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.तर उद्या दि.२० डिसेंबर रोजी सकाळी हिंदू दहनभूमी गोवर्धघाट नांदेड येथे त्यांच्या पार्थिवावर पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भोकर अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले पो.ना.शिवराम श्रीपतराव समंदरे(बक्कल नंबर १३७८) हे आपल्या बहिणीला सोडण्यासाठी दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी नांदेड येथून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला गेले होते.दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी मुंबई उपनगरात बहिणीस सोडण्यासाठी त्यांनी मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेच्या महिलांच्या डब्यात बहिणीस बसविले व पुरुषांच्या डब्यात बसण्यासाठी ते धावत गेले.दरम्यानच्या काळात लोकल रेल्वेच्या गतीत वाढ झाली व पुढच्या डब्यात बसतांना त्यांचा तोल गेल्याने रेल्वे खाली येऊन त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.त्यांच्याजवळ पोलीस दलातील त्यांचे ओळखपत्रे होती.त्यामुळे रेल्वे पोलीसांना त्यांची ओळख पटविण्यात मोठी मदत झाली. त्यावरुन रेल्वे पोलिसांनी सदरील अपघाताबाबद नांदेड पोलीसांना माहिती कळविली असून रितसर अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे.
मयत पो.ना.शिवराम समंदरे हे मुळचे देगलूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांचे कुटुंब सद्या नांदेड येथे वास्तव्यास आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी व दोन मुली असून उद्या दि.२० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी हिंदू दहनभूमी गोवर्धघाट नांदेड येथे त्यांच्या पार्थिवावर पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने पोलीस दल, नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.