भोकरमध्ये व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेऊन संजय बियाणी यांच्या हत्तेचा केला निषेध!
मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठविण्यात आले निषेध आणि मागण्यांचे निवेदन…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांनी प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर शारदा नगर नांदेड येथील त्यांच्या घरासमोर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना दि.५ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली.या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या संजय बियाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदरील अमानुष घटना ही निंदनिय असल्याने भोकर येथील माहेश्वरी समाज व्यापारी बांधवांनी दि.६ एप्रिल रोजी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन जाहीर निषेध व्यक्त केला असून या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.सदरील मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दि.५ एप्रिल २०२२ रोजी गोळ्या झाडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे.घटनास्थळावरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.यामध्ये गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं स्पष्ट दिसत आहे.गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या संजय बियाणी यांचा नांदेड येथील एका खासगी रुग्णालायत उपचार सुरु असताना मृत्यू झाला.नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.तसेच त्यांचा चालक रवि यांच्यावर देखील गोळी झाडण्यात आली.नांदेड शहरातील भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली व दहशतीचे वातावरण आहे.बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.त्यांच्यावर कोणी हल्ला केला,हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय बियाणींच्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध घेणे सुरु केले आहे.
संजय बियाणी हे नांदेडमधील बांधकाम व्यवसायातले मोठे प्रस्थ आहेत.खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे नांदेड शहरातील व्यापाऱ्यांत तणावाचे निर्माण झाले आहे.संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती.तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती.मात्र तीन महिन्यांपूर्वीच १५ जणांची सुरक्षा काढण्यात आली होती,त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.त्यांची सुरक्षा काढली नसती तर ही हत्त्या झाली नसती असे व्यापारी वर्गातून बोलल्या जात आहे.तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची चर्चा ही होत आहे.संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात भीती व्यक्त केली जात असून सबंध जिल्ह्यात या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.
याच अनुशंगाने भोकर येथील माहेश्वरी समाज व व्यापारी बांधवांनी दि.६ एप्रिल २०२२ रोजी शहरातील प्रतिष्ठाणे बंद ठेऊन संजय बियाणी यांची हत्त्या करणाऱ्या आरोपींचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला आहे.तसेच सदरील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात येऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी.स्व. संजय बियाणी यांच्या कुटूंबीयांना संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.सदरील मागण्यांचे व निषेधार्थचे निवेदन या व्यापा-यांच्या एका शिष्ठमंडळाने भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीप पाटील वळसे व सर्व संबंधीतांना पाठविले असून सदरील निवेदनावर उद्योजक देवानंद धूत,सारंग मुंदडा,राधेश्याम असावा,रामदेव डोडिया, व्यंकटेश असावा,शेरू मंत्री,राजेश असावा,पवन मुंदडा,विनोद मुंदडा,गिरधारी दरक यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.