Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

नागपंचमीच्या दिवशी ‘त्यांनी’ चार सापांना दिले जीवनदान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : साप म्हटले की,प्रत्येकजण घाबरतोच.त्यामुळे विषारी असो वा बिनविषारी साप दिसला की त्यास मारुन टाकण्याचा प्रयत्न बहुतांश केला जातो.परंतू स्वतः चा जीव धोक्यात घालून त्यांना न मारता पकडून जीवनदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडणारे व्यक्ती म्हणजेच ‘सर्प मित्र’ होत.अशाच प्रकारे जोखमीचे काम भोकरचे सर्प मित्र करत असून शेकडो सापांना जीवनदान देण्याचे काम त्यांनी केले आहे. नागपंचमीच्या दिवशी भोकर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणहून त्यांनी विषारी व बिनविषारी असे चार साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून जीवनदान देण्याचे सेवाभावी काम केले आहे.स्वतःचा जीव धोक्यात घालून हे महत्वपुर्ण सेवाकार्य करतांना मात्र त्यांच्याकडे सुरक्षा कवच व आदी साधनांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले असून वन विभागाने त्यांना विमा आणि सुरक्षा कवचे उपलब्ध करुन द्यावेत,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मानव व विषारी,बिनविषारी सापांना जीवनदान देण्याचे मानवसेवेचे कार्य भोकर येथील अर्जुनसिंग ठाकूर,दलित डोंगरे,मिलिंद दुधारे व अन्य काही सर्प मित्र करत आहेत. साप दिसल्याची माहिती त्यांना नागरिकांकडून मिळताच अतिशय तत्परतेने हे सर्वजण त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या चपळाईने त्या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात.दि.२ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमीच्या सणानिमित्त अनेक माता भगिणी या सापांची प्रतिकात्मक पुजा करण्यासाठी वारुळाला जात असतांना भोकर शहर व परिसरातील काही ठिकाणी साप निघाल्याची माहिती अर्जुनसिंग ठाकूर,दलित डोंगरे आणि मिलींद दुधारे यांना मिळाली.तसेच त्या सापांना काही नागरिक जीवे मारत असल्याची माहिती ही त्यांना मिळाली असता त्या सापांना कोणीही मारु नये असे आवाहन करत सर्पमित्र अर्जुनसिंग ठाकूर,दलित डोंगरे,मिलिंद दुधारे यांनी त्या ठिकाणी तत्परतेने धाव घेतली व अतिशय चपळायीने विषारी भारतीय कोब्रा नाग,बिन विषारी मांजरा साप,महाराष्ट्रात दुर्मिळ असलेला बिनविषारी काळतोंड्या साप,स्पेक्ट्रिकल कोब्रा साप,असे चार साप त्यांनी पकडले.याच बरोबर एका फर्निचरच्या दुकानातून भारतीय उद मांजर(मरनागी) देखील पकडले.यानंतर त्या चार सापांसह उद मांजरास भोकर वन परिक्षेत्र कार्यालयात नेले.यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान यांनी सर्प मित्र व उपस्थित नागरिकांना त्या सापांविषयी आणि उद मांजरा विषयी माहिती दिली.यामुळे उपस्थितांतून सापांविषयीची भिती व गैर समज दुर झाला. यानंतर त्या सापांना व उद मांजरास भोकर शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून देण्यात आले.

या सर्पमित्रांच्या धाडसी सेवाकार्याचे नागरिकांतून कौतुक होत असून आभार ही मानले जात आहेत.परंतू आपला जीव धोक्यात घालून विषारी-बिनविषारी जातीच्या सापांना पकडून त्यांना जीवनदान देणाऱ्या या सर्पमित्रांना मानधन आहे ना सुरक्षेची हमी आहे.साप पकडतांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली साधने,संरक्षक किट ही त्यांच्याकडे उपलब्ध नाही.अशा परिस्थितीत ही ते जोखमीचे काम करत असल्यामुळे शासनाने व वन विभागाने त्यांना जीवन सुरक्षा विमा,मानधन व सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी वन परीक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान यांच्याकडे सर्पमित्रांसह उपस्थित नागरिकांतून करण्यात आली आहे.

साप आढळल्यास घाबरु नये वत्यांना न मारता वन विभाग आणि सर्प मित्रांशी संपर्क साधावा-प्रतिक मोडवान

भोकर वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान यांनी सापांविषयी माहिती देतांना म्हटले आहे की,विषारी सापांमध्ये मण्यार,घोणस (परड),नाग,फुरशे हे चार विषारी जाती आपल्याकडे आढळतात.तर इतर बहुतांश जाती ह्या बिनविषारी असून त्यात धामीन, तस्कर,नाणींटी, कवड्या,कुकरी,धुळगीन, पांदिवड जातींच्या सापांचा समावेश आहे. साप दिसले तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये.तसेच एखाद्या वेळी सर्पदंश झाला तरी उगिच कोणताही झाडपाला खाऊ नये व पांडाळाकडे जाऊन वेळ वाया घालू नये.तर ताबडतोब दवाखान्यात जाऊन तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा.लोकवस्तीच्या ठिकाणी कुठेही विषारी-बिनविषारी साप आढळून आल्यास त्या सापांना मारु नये व सर्पमित्र अर्जुनसिंग ठाकूर,दलित डोंगरे आणि वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी,असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान यांनी यावेळी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !