भोकरच्या श्रोत्यांची ‘दिवाळी पहाट’ स्वरनिनादच्या सप्तसुर आविष्काराने बहरली
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : सेवा समर्पण परिवार भोकरच्या वतीने दि.२२ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक कैलास गड येथे आयोजित केलेली श्रोत्यांसाठीची ‘दिवाळी पहाट’ ही प्रसिद्ध गायक प्रा.प्रणव पडोळे निर्मित स्वरनिनाद गायन संचातील गायकांच्या सुरेल गायकीने व तालसौदर्याने सजलेल्या अद्वितीय सप्तसुरांच्या मंगलमयी संगीत अविष्काराने अक्षरशः बहरुन गेली.
कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याच्या अनुशंगाने घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे गेली दोन वर्षे इच्छा असून ही सण उत्सोवात एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करता आला नाही.यावर्षी ते निर्बंध हटविले गेल्याने व त्यातल्या त्यात भोकर शहर आणि परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा अभाव असल्याने तालुक्यातील विविध क्षेत्रात सेवेतून समर्पणाचा ठसा उमटविणा-या सेवा समर्पण परिवाराने ऐतिहासिक कैलास गड भोकर येथे धनत्रयोदशी दिनी दि.२२ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ५:३० वाजता स्वरनिनादच्या ‘दिवाळी पहाट’ स्वर मैफिलीचे आयोजन केले होते.
या संगीत मैफिलीचा प्रारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला.यावेळी श्री दत्त संस्थानचे महंत उत्तम बन महाराज,भोकर विचार विकास मंच चे अध्यक्ष डॉ यु.एल.जाधव,शांतीबन महाराज, सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.या सप्तसुर मैफिलीची सुरुवात गायक तथा संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्या ‘सुर निरागस हो…’ या गिताने सुरसम्राट प्रा.प्रणव पडोळे यांनी केली.या नंतर सुमधूर आवाजाच्या धनी सौ.शिवकांता प्रणव पडोळे यांनी ‘प्रभाती सुर नभी रंगती…’ या गिताची साद घालून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली.तर शास्त्रीय संगीतात निपुण असलेल्या प्रा.राजेश ठाकरे यांनी ‘अनंता तुला कोन पाहु शके…’ गीताने संगीत मैफिलीची रंगत चढवली.तर गायीका शीतल जामगे यांनी ‘राम का गुणगान करिए…’ हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.पुढे या मैफिलीत खरी रंगत भरविली ती म्हणजे प्रा. प्रणव पडोळे व प्रा.राजेश ठाकरे यांच्यातील शास्त्रीय गायनाच्या जुगलबंदीने सजलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा…’ या अभंगाच्या सादरीकरणातून.तालसौदर्याने सजत भजत बहरत पुढे निघालेल्या या मैफिलीत मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी मुक्तहस्त टाळ्यांनी प्रतिसाद दिल्याने तेथील निसर्गरम्य वातावरणात आनंद ओसंडून वाहतांना दिसत होता.या नंतर दीपावली मनाए सुहानी…,अबीर गुलाल उधळीत रंग…,नंदलाला कृष्ण मुरारी…,निघालो घेऊन दत्ताची पालखी…,कान्हा आन पडी मै तेरे द्वार…,माझे माहेर पंढरी…,आली माझ्या घरी दिवाळी… यासह आदी गितांचे सादरीकरण झाले.तर सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवी ने प्रा.राजेश ठाकरे व प्रा.प्रणव पडोळे यांनी या ‘दिवाळी पहाट’ सप्तसुर मैफिलीची सांगता केली.
ओवीपासून अभंगापर्यंत व भुपाळीपासून भैरवीपर्यंत रंगत भरविलेल्या या सप्तसुर मैफिलीला आपल्या ओजस्वी वाणीतून सदाबहार सुत्रसंचालनाची साथ प्रख्यात कवि, निवेदक तथा प्र.गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी दिली.तर सहकारी कलावंत परमानंद जाधव यांनी तबला, विकास चौधरी यांनी पखवाज,सुरज लोखंडे यांनी ऑक्टोप्याड आणि चेतन चित्ते यांनी कि बोर्ड ने संगीत साथ दिली.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी उद्घाटकीय मनोगतातून दिवाळी पहाटचे आयोजक, स्वरनिनाद गायन संच व या सप्तसुर संगीत मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या भोकर पंचक्रोशितील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापारी,पत्रकारिता व संगीत यासह आदी क्षेत्रातील श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या.या संगितोत्सवात बहुसंख्येने सहभागी होऊन दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सर्वांचे आभार सेवा समर्पण चे सचिव पत्रकार विठ्ठल फुलारी यांनी मानले.तर यशस्वीतेसाठी सेवा समर्पण परिवाराच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.