भुकंप सदृष्य आवाजांमुळे पांडूरणा, बोरवाडी परिसरातील पाणी पातळी घसरली ?
अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व इंधन विहिरी उन्हाळ्या पुर्वीच कोरड्या पडण्याच्या मार्गावर…
भुगर्भ व जल तज्ञांना लवकरच पाचारण करून सर्वेक्षण आणि संशोधन करु-तहसिलदार राजेश लांडगे
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : तालुक्यातील मौ.पांडुरणा,बोरवाडी, संमदरवाडी परिसरात सप्टेंबर ते आक्टोंबर २०२२ मध्ये भुगर्भातुन भुकंप सदृश्य आवाजांची मालिका सुरू झाली होती.यावेळी भुगर्भ तज्ञ, भुजल तज्ञ व प्रशासकीय अधिकारी यांसह आदींनी भेटी दिल्या होत्या.यावेळी तो आवाज कशाचा होता ? हे मात्र ते निश्चितपणे सांगू शकले नाहीत.परंतू त्याचा परिणाम परिसरातील शेतकऱ्यांना आता दिसून येत आहे.उन्हाळ्या पुर्वीच विहिरी व इंधन विहिरी कोरड्या पडत असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांपुढे मोठा गंभीर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासन प्रशासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन परिसरातील भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानितून बाहेर काढावे असे विनंती पर आवाहन शासन प्रशासनाकडे शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मौ.पाडुरणा,बोरवाडी,संमदरवाडी गाव व शिवारात परिसरात दि.१८ सप्टेंबर ते ४ आक्टोंबर २०२२ दरम्यानच्या काळात भुगर्भातुन भुकंप सदृष्य आवाज येण्याची मालिका सुरू झाली होती.या वेळी सदरील आवाजामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते.तर अनेकांनी या भिती पोटी घराबाहेर रात्र जागून काढल्या होत्या.भयभीत झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी ते आवाज नेमके कशाचे आहेत ? याचे संशोधन व्हावे म्हणून नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शासन प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यामुळे तहसिलदार राजेश लांडगे व शासन प्रशासनाच्या आधिकाऱ्यांसह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भुकंप तज्ञ आणि भुजल सर्वेक्षण विभागाच्या जल तज्ञांनी परिसरात भेटी दिल्या होत्या.तसेच नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन ही केले होते.परंतू त्या तज्ञांनी तत्कालीन ‘ते आवाज’ नेमके कशाचे होते व भविष्यात त्याचा काय परिणाम होऊ शकतो ? याबाबत मात्र ठाम पणे काही सांगितले नव्हते.
त्या आवाजांचा परिणाम हल्ली दिसून येत आहे.तो असा की,या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी एप्रिल ते मे महिन्यांपर्यंत मुबलक पणे उपलब्ध व्हायचे.परंतू परिसरातील काही शेतकऱ्यांच्या इंधन विहिरी व विहिरींची पाणी पातळी डिसेंबर व जानेवारी २०२३ या महिन्यातच घटल्याचे निदर्शनास येत आहे.जसे की,पांडुरणा येथील शेतकरी मुरलीधर काळबा बरकमकर, कोंडीराम नारायण राजेमोड व बोरवाडी येथील शेतकरी रामचंद्र किशन कोठूळे यांच्या इंधन विहिरीचे पाणी उन्हाळ्याच्या शेवट पर्यंत मुबलकपणे उपलब्ध व्हायचे,या विश्वासावर उपरोक्त शेतकऱ्यांसह अनेकांनी आपल्या शेतात रब्बी पिके व फळ भाजी पिकांची लागवड केली आहे.असे असतांना डिसेंबर ते जानेवारी २०२३ या दरम्यानच्या काळातच त्याच्या विहीरी व इंधन विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असून पाणी पातळी घटल्याचे निदर्शनास येत आहे.ही परिस्थिती त्या भुकंप सदृष्य आवाजांमुळेच झाली असल्याचे परिसरातील शेतकरी व नागरिकांतून चर्चिल्या जात आहे.परिणामी मुबलक पाणी पुरवठ्या अभावी उभी पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
नेहमीच आसमानी व सुलतानी संकटात अडकलेल्या या शेतकऱ्यांपुढे हे एक नविन संकट उभे राहिले आहे. परिसरातील पाणी पातळी जर अशीच घटत राहिली तर शेतकऱ्यांसह गुरांना देखील पाणी मिळणार नाही अशी भिषण परिस्थिती निर्माण होईल असे चित्र दिसत आहे.यामुळे परिसरातले शेतकरी व नागरिक मोठ्या आर्थिक संकटात ही सापडणार आहेत.म्हणून उपरोक्त गावातील शेतकरी पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. तरी या शेतकऱ्यांपुढे उभे असलेल्या नुतन संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासन व प्रशासनाने भुगर्भ व जल तज्ञांना त्वरीत पाचारण करून परिसरातील भुपातळी व जलपातळीचे योग्य संशोधन करावे आणि होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीतून या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात यावे,असे विनंतीपर आवाहन त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
भुगर्भ व जल तज्ञांना लवकरच पाचारण करून सर्वेक्षण आणि संशोधन करु-तहसिलदार राजेश लांडगे
पाणी पातळी घटत असल्याने शेतकरी भयभीत होते आहेत असे निदर्शनास आल्यावरुन भोकर तहसिलचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याशी संपर्क साधून तेथील सद्य परिस्थिती व शेतकऱ्यांच्या आवाहनाविषयी त्यांना सांगितले असता ते म्हणाले की,असे असेल तर लवकरच आम्ही मंडळ अधिकारी,तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या परिसरातील घटत असलेल्या पाणी पातळी बाबद सर्वेक्षण करु.तसेच वरिष्ठांना याबाबत कळवून भुगर्भ तज्ञ व भुजल तज्ञांना पाचारण करुन योग्य ते संशोधन करण्यासाठी विनंती करु,असे आश्वस्त केले आहे.तसेच शासन व प्रशासन त्यांच्या सोबत असून योग्य संशोधन आणि सर्वेक्षण होईपर्यंत शेतकरी आणि नागरिकांनी भयभीत होऊ नये,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.